सुशांतच्या आत्महत्येमागे वेगळंच कारण?; पोलीस चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 03:52 AM2020-06-20T03:52:18+5:302020-06-20T06:56:49+5:30
झोप येत नाही, मनात वाईट विचार येतात, डॉक्टरकडे व्यक्त केली होती मानसिक स्थिती
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याने तणावातून आत्महत्या केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. मात्र त्याला कामाचा तणाव नसून भावनिक नात्यांमध्ये आलेले अपयशच त्याने इतके टोकाचे पाऊल उचलण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा अंदाज आता तपास अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. पोलिसांनी त्याच्यावर उपचार करणाऱ्या हिंदुजा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचा जबाब नोंदवल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरला सुशांत सहा महिन्यांपूर्वी भेटला होता. ‘मी गेल्या वर्षभरापासून तणावात आहे. मला झोप येत नाही, मनात वाईट विचार येतात. अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप होण्यापूर्वी सर्व काही ठीक होते’, असे त्याने सांगितल्याचा जबाब डॉक्टरने पोलिसांना दिला आहे. त्यानंतर एका चित्रपटात सहकलाकार असलेली अभिनेत्री क्रिती सॅनन त्याच्या आयुष्यात आली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली. मात्र तिच्या आईला या दोघांच्या नात्याबद्दल समजले आणि तिने मुलीला सुशांतपासून वेगळे राहण्यास सांगितल्याने त्यांचे ब्रेकअप झाले.
दरम्यान, काही खासगी कारणांमुळे त्याची मॅनेजर दिशा सालीयनही त्याच्यापासून वेगळी झाली. सुशांतला डॉक्टरने ‘अँटी डिप्रेशन’ कोर्स दिला होता. त्यानुसार तीन वेळा त्यांची भेट झाली, मात्र नंतर लॉकडाऊनमुळे तो डॉक्टरला भेटू शकला नाही. त्यातच तो एका मित्राच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या संपर्कात आला. वर्सोव्यात एका मैत्रिणीसोबत राहणाºया रियाकडे तो आकर्षित झाला. त्यांनी एकत्र परदेशवाºया केल्या. मात्र रियाच्या रागिष्ट स्वभावामुळे सुशांतचे तिच्यासोबत वाद व्हायचे.
रियाने पोस्ट डिलीट करायला लावली?
सुशांतने रिया आणि त्याच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर काही पोस्ट केली होती. मात्र त्यावरून त्यांच्यात वाद झाले आणि तिने त्याला ती पोस्ट डिलीट करायला भाग पाडले, असे डॉक्टरने सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अंकितासोबतच्या ब्रेकअपचा पश्चाताप
सुशांतने एका शोमध्ये अंकिता लोखंडे हिला लग्नाचा प्रस्ताव दिला. त्याला होकार देत ती सहा वर्षे त्याच्यासोबत राहिली. मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. सुशांतच्या आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वीच अंकिताचा तिच्या मित्रासोबत साखरपुडा झाला.
डॉक्टरने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सुशांत हा अंकिताची सतत आठवण काढत होता. त्याच्या मनात तिच्याविषयीचे प्रेम संपले नव्हते. अंकिताने त्याचे मन कधीच दुखावले नाही, ती त्याची काळजी घ्यायची, असे त्यानेच डॉक्टरला सांगितले होते.
अंकितासारखे खरे प्रेम करणारी दुसरी मुलगी त्याच्या आयुष्यात परत आलीच नाही. त्यामुळे तिच्याशी संबंध तोडल्याचा फारच पश्चाताप झाल्याचेही सुशांतने सांगितल्याची माहिती डॉक्टरने जबाबात दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
चित्रपट कंत्राटाची कागदपत्रे मागवली
पोलिसांनी गुरुवारी रिया चक्रवर्तीसह पीआर मॅनेजर राधिका निहलानी आणि माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांचेही जबाब नोंदविले. अद्याप १३ हून अधिक लोकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
सुशांत ‘नेशन इंडिया फॉर वर्ल्ड’ नामक गरिबांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेची नोंदणी करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती आहे. दरम्यान, एका बॅनरकडून सुशांतसोबतच्या चित्रपट कंत्राटाची कॉपी पोलिसांनी मागवली असल्याचेही सूत्रांकडून समजते.
सुशांत ‘बायपोलर’ विकाराने होता ग्रस्त
‘बायपोलर’ ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे, ज्याने ग्रासलेल्या व्यक्तीचा मूड बदलत राहतो. याला मॅनिक डिप्रेशन असेही म्हणतात. यामुळे ते अतिरिक्त (वाजवीपेक्षा जास्त) आनंदी, सकारात्मक असतात. अतिउदार होऊन भेटवस्तू देणे, अवास्तव खरेदी करणे यासारख्या गोष्टी करतात. ते चिडचिडेही असू शकतात. त्यांना भ्रम होऊ शकतात. या मूडच्या अगदी विरुद्ध टोकाचा मूड म्हणजे नैराश्य. ज्यामुळे तो दु:खी, उदास होतो. त्याला कशातच रस वाटत नाही. इतरांशी कोणताच संवाद साधण्याची इच्छा नसते. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात.