नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमागे काही काळेबेरे आहे हे पुराव्याने सिद्ध होण्याआधीच इलेक्ट्रॉनिक माध्यमे आपल्याला दोषी ठरवून शिक्षाही देऊन मोकळे झाली आहेत, असा असा आरोप सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने केला असून या ‘मीडिया ट्रायल’ला आवर घालून आपल्या व्यक्तिगत हक्कांचे रक्षण करावे, असे साकडे तिने सर्वोच्च न्यायालयास घातले आहे.रियाने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप करणारी फिर्याद सुशांत सिंहच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे केली. त्यावरून गुन्ह्याचा तपास आता ‘सीबीआय’कडे वर्ग करण्यात आला आहे. परंतु त्याआधी तो तपास मुंबई पोलिसांकडे सोपविण्यासाठी रियाने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्या याचिकेवर उद्या मंगळवारी पुढील सुनावणी व्हायची आहे.सुशांतच्या आत्महत्येनंतर महिनाभरात आशुतोष भाकरे व समीर शर्मा या आणखी दोन अभिनेत्यांनीही आत्महत्या केली. पण त्यासंदर्भात कोणी एका शब्दानेही बोलत नाही, असेही तिने नमूद केले.रिया म्हणते की, हे प्रकरण न्यायालयात उभे राहण्याआधीच माध्यमांमध्ये आणि खास करून इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर हा खटला हिरीरीने चालविला जात आहे. सर्व साक्षीदारांच्या तपासण्या व उलटतपासण्याही तेच घेत आहेत. एवढेच नव्हे तर सुशांतच्या आत्महत्येमागे काही काळेबेरे आहे हे पुरावाने सिद्ध होण्याआधीच ही माध्यमे आपल्याला दोषी ठरवून शिक्षा देऊनही मोकळी झाली आहेत.या प्रकरणाची आरुषी तलवार खून व ‘२जी स्पेक्ट्रम घोटाळा’ या दोन प्रकरणांशी तुलना करून रियाचे प्रतिज्ञापत्र म्हणते की, या दोन प्रकरणांमध्येही अशीच ‘मीडिया ट्रायल’ झाली होती व माध्यमे आरोपींना दोषी ठरवून मोकळी झाली होती. प्रत्यक्ष न्यायालयात चाललेल्या खटल्यांत मात्र सर्व आरोपी निर्दोष ठरले होते.अशा प्रकारच्या ‘मीडिया ट्रायल’ने राजकीय अॅजेंडासाठी आपल्याला बळीचा बकरा केले जात आहे. त्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असून आपला खासगीपणाचा हक्क पार चुरडला जात आहे, असेही तिचे म्हणणे आहे.मागणीवर ठाममूळ याचिकेतील आपल्या मागणीचा ठाम पुनरुच्चार करून रिया म्हणते की, सुशांतचे वडील पाटण्यात राहतात व त्यांनी तेथे फिर्याद केली एवढ्यानेच बिहार पोलिसांना किंवा त्यांच्या संमतीने ‘सीबीआय’ला तपासाचा अधिकार मिळत नाही.मूळ घटना महाराष्ट्रात घडली असल्याने कायद्यानुसार फक्त महाराष्ट्र पोलीसच तपास करू शकतात. बिहारमध्ये तपासाचा नसलेला अधिका केवळ राजकीय कारणांसाठी ओरबाडून घेतला जात आहे, असाही तिने आरोप केला आहे.
Sushant Singh Rajput Suicide: "राजकीय अजेंड्यासाठी मला बळीचा बकरा केला जातंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 8:25 AM