Sushant Singh Rajput Suicide: रिया म्हणते, सुशांतसिंहच्या माझ्याकडे फक्त दोनच वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:50 AM2020-08-09T04:50:17+5:302020-08-09T04:50:43+5:30
ईडीला दिली माहिती; हस्तलिखित टिपण, पाण्याची बाटली
मुंबई : गेल्या महिन्यात मृत्यू झालेल्या बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कार्डांवरून परस्पर मोठ्या रकमा काढून खर्च केल्याचे आरोप झालेली त्याची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांतने स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेले एक आभाराचे टिपण व एक पाण्याची बाटली एवढ्या त्याच्या दोनच वस्तू आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे.
सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद सुशांतच्या वडिलांनी केल्यावर त्याआधारे ‘मनी लॉड्रिंग’चा गुन्हा नोंदवून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाची शुक्रवारी आठ तास चौकशी केली होती. या पार्श्वभूमीवर रियाने आपल्याकडे सुशांतच्या वरीलप्रमाणे फक्त दोनच वस्तू असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले.
यापैकी एक वस्तू सुशांतने स्वत:च्या हस्ताक्षरात इंग्रजीत लिहिलेले एक टिपण आहे. त्यात त्याने स्वत:च्या आयुष्याखेरीज ‘लिल्लू’, ‘मॅडम’, ‘बेबू’, ‘सर’ व ‘फज’ यांचे त्यांनी केलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. यातील टोपणनावांचा खुलासा करताना रियाने म्हटले की, ‘लिल्लू’ म्हणजे माझा भाऊ शौविक, ‘मॅडम’ म्हणजे माझी आई, ‘सर’ म्हणजे माझे वडील, ‘बेबू’ म्हणजे स्वत: मी व ‘फज’ म्हणजे आमचा पाळीव कुत्रा.
रियाने पाण्याची बाटली आणि या हस्तलिखित टिपणाची छायाचित्रेही प्रसिद्ध केली. या टिपणावर कोणतीही तारीख नाही. पण त्यातील निळ्या शाईतील इंग्रजीमधील हस्ताक्षर सुशांतचे आहे, असा तिचा दावा आहे.
शोविक चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रियाचा भाऊ शोविकची कसून चौकशी सुरू केली आहे. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्याच्याकडे सुशांतशी असलेला संबंध व भागीदारीतील कंपनी आणि त्याच्या बँक खात्यावर जमा झालेल्या रकमेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेतली. रियाला पुन्हा चौकशीस बोलावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दक्षिण मुंबईतील बेलार्ड पिअर येथील कार्यालयात शुक्रवारी रियासह शोविकही होता. मात्र त्याला बाहेरच बसवून ठेवले होते. रियाच्या चौकशीत शोविकच्या बँक खात्यात लाखो रुपये असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, ईडीने आज त्याच्याकडे विचारणा केली. सुशांतचा रूम पार्टनर सिद्धार्थ पिठानीसह अन्य काहींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रियाने शुक्रवारी लेखापरीक्षण अहवाल ईडीला दिला. यात तिने खार व नवी मुंबईत तिच्या नावे असलेल्या फ्लॅटबद्दल, तिला त्यासाठी कसे कर्ज मिळाले, हा तपशील दिला.