Sushant Singh Rajput Suicide: ईडीच्या चौकशीला रिया चक्रवर्तीचं असहकार्य; अनेक प्रश्न अनुत्तरित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 07:44 PM2020-08-07T19:44:30+5:302020-08-07T19:53:57+5:30
Sushant Singh Rajput Suicide: पुढील आठवड्यात पुन्हा रियाची चौकशी होण्याची शक्यता; भाऊ शौविकची चौकशी
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्तीची अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) चौकशी सुरू आहे. जवळपास ७ तासांपासून रियाची चौकशी करण्यात येत आहे. ईडीनं रियावर मनी लॉड्रिंगचा ठपका ठेवला आहे. मात्र ती चौकशीला सहकार्य नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांना रियानं 'माहीत नाही' असं उत्तर दिलं.
सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यातून झालेले व्यवहार, दोन फ्लॅटची खरेदी याचा तपास ईडीनं सुरू केला आहे. त्याच संदर्भात चौकशी करण्यासाठी आज रियाला ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचीदेखील चौकशी करण्यात आली. दोन तास चौकशी झाल्यानंतर तो ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडला. त्यानंतर थोड्या वेळानं तो पुन्हा ईडीच्या कार्यालयात पोहोचला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रांची मागणी केली होती. ती आणण्यासाठी शौविक कार्यालयातून बाहेर पडला होता.
ईडी ३ टप्प्यांमध्ये रियाची चौकशी करणार आहे. रियाची दुसऱ्या टप्प्यातील चौकशी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आज रिया, शौविक आणि सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौकशी करण्यात आली. मात्र रियानं बऱ्याचशा प्रश्नांना उत्तरं दिलेली नाहीत. रियाला ईडीकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मात्र रिया ईडीच्या अधिकाऱ्यांना तपशील माहीत नाही, अशी उत्तरं देत आहेत. सुशांतचा फ्लॅटमेट असलेल्या सिद्धार्थ पिठानीची चौकशी ८ ऑगस्टला होणार आहे.
ईडीची चौकशी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी रियाच्या वकिलांनी केली होती. मात्र चौकशीला न पोहोचल्यास गुन्हा दाखल करू, असा आक्रमक पवित्रा ईडीनं घेतला. त्यामुळे रिया चौकशीसाठी पोहोचली. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. २०१८-१९ मध्ये रियानं तिचं उत्पन्न जवळपास १४ लाख रुपये दाखवलं होतं. मग तिनं दोन फ्लॅट कसे खरेदी केले, त्यासाठी पैसे कुठून आले, सुशांतच्या खात्यातून व्यवहार कसे झाले, याची चौकशी ईडीकडून करण्यात येणार आहे.