मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं होतं. मुंबईनं माणुसकीच गमावली असल्याचं अमृता यांनी ट्विटमधून म्हटलं होतं. अमृता यांच्या विधानाला पहिल्यांदाच ठाकरे सरकारमधून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांच्या विधानावर जोरदार हल्ला चढवला आहे.'सत्तेत असताना पाच वर्षात फडणवीस सरकारनं पोलिसांची स्तुती केली. पोलिसांना शाबासकी दिली. पोलिसांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. पण केवळ सत्ता गेली म्हणून त्यांना असुरक्षित वाटत असेल, तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो,' अशा शब्दांत परब यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आम्ही असुरक्षित आहोत, असं मुंबईतला कुठला नागरिक म्हणाला आहे का? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? त्याच पोलिसांची सुरक्षा घेऊन आज त्या फिरत आहेत', अशी टीका परब यांनी केली.गेले पाच वर्ष फडणवीस सरकार होतं. यादरम्यान पोलीसदेखील तेच होते. सरकार बदललं म्हणजे पोलीस बदलत नाही. ज्या पोलिसांच्या सुरक्षेत गेले पाच वर्ष त्या होत्या, त्या पोलिसांवरच त्यांना अविश्वास असेल तर त्यांनी खुशाल हे राज्य सोडून जावं. ज्या पोलिसांची सुरक्षा घेऊन त्या पाच वर्ष फिरल्या, त्याच पोलिसांपासून त्यांना असुरक्षित वाटतंय का?, असा सवाल परब यांनी विचारला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात शंभर टक्के राजकारण केलं जात आहे. खुर्ची गेल्याची तडफड यातूनच दिसते, अशा शब्दांत अनिल परब यांनी नामोल्लेख टाळून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा ज्या तऱ्हेने तपास सुरू आहे, त्यावरून मुंबईनं माणुसकी गमावलीय असं मला वाटतंय. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी JusticeforSushantSingRajput आणि JusticeForDishaSalian असे दोन हॅशटॅग देखील वापरले.
Sushant Singh Rajput Suicide: मुंबईत इतकंच असुरक्षित वाटत असेल तर...; अमृता फडणवीसांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 5:39 PM