Join us

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणींची गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 5:06 PM

High Court : सुशांत सिंग राजपूतच्या बहिणी प्रियांका सिंग आणि मीतू सिंग यांनी त्यांच्यावर नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.

मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या बहिणी प्रियांका सिंग आणि मीतू सिंग यांनी त्यांच्यावर नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. सुशांतसिंगसाठी बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन घेतल्याप्रकरणी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिने ७ सप्टेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात या दोघींविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविला. 

या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक  यांच्या खंडपीठापुढे होती. मात्र, हे प्रकरण तेवढे तातडीचे नसल्याचे म्हणत या याचिकेवरील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली.

रियाने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रतिबंधित असलेली औषधे दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉ. तरुण कुमार यांनी सुशांतच्या लिहून दिली होती आणि ही औषधे सुशांतच्या दोन्ही बहिणींनी लिहून आणली होती. 

प्रियांका व मीतू सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, रिया चक्रवर्तीने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या आधारे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये अनेक विसंगती आहेत. त्याशिवाय रियाने तक्रार दाखल करण्यास ९० दिवसांहून अधिक विलंब लावला. ८ जूनला औषधांचे प्रिस्क्रिप्शन देण्यातबाले होते आणि त्याच दिवशी सुशांतचने रियाला घर सोडून जाण्यास सांगितले आणि तक्रार ७ सप्टेंबरला नोंदविण्यात आली.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असल्याने वांद्रे पोलिसांनी हे ही प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले. सीबीआयला कोणतीही कठोर कारवाई करू न देण्याचे निर्देश द्यावेत, अशी अंतरिम मागणी या दोन्ही बहिणींनी न्यायालयाकडे  केली आहे.

डॉ. तरुण कुमार यांनी लिहून दिलेली औषधे एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रतिबंधित नाहीत औषधांवर बंदी असल्याचा पुरावा नाही. याचिककर्त्यांना नाहक गोवण्यासाठी गुन्हा नोंदविण्यात आला आहे,' आई याचिकेत म्हटले आहे.  सुशांतचे मानसिक आरोग्य ठीक नव्हते व तो ड्रग्स घ्यायचा, हे सांगून रिया सुशांतची प्रतिमा मलिन करत आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. 

-----------------------

विशेष  एनडीपीएस न्यायालयाने मंगळवारी रिया व शोविक यांच्या न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. याआधी विशेष न्यायालयाने या दोघांचाही  जामीन अर्ज फेटाळला. त्याविरोधात या दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतउच्च न्यायालयमुंबईबॉलिवूड