मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. सीबीआयनं तपास हाती घेतल्यापासून बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. कालपासून रियाची चौकशी सुरू झाल्यानं आता आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर जीविताला धोका असल्याचं रियानं म्हटलं होतं. त्यासाठी तिनं परवा काही व्हिडीओदेखील इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यानंतर आता मुंबई पोलिसांनी रियाला संरक्षण दिलं आहे. सीबीआयनं विनंती केल्यानं पोलिसांकडून रियाला संरक्षण पुरवण्यात आलं आहे.कालपासून रियाची सीबीआय चौकशी सुरू झाली. चौकशीसाठी रिया तिच्या जुहूमधील निवासस्थानाहून सांताक्रूझमधील डीआरडीओच्या अतिथीगृहात जाते. याच ठिकाणी सीबीआयचं पथक वास्तव्यास आहे. या प्रवासादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी रियानं केली होती. रियाच्या घराबाहेर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा असल्यानं काल तिला घरी जाताना अडचणी आल्या. त्यानंतर तिनं थेट पोलीस ठाणं गाठलं आणि संरक्षण देण्याची मागणी केली.
दोन दिवसांपूर्वी रियानं शेअर केला होता व्हिडीओरियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना अंमबजावणी संचलनालयाकडून समन्स बजावण्यात आलं होतं. परवा त्यांची चौकशीदेखील करण्यात आली. वडील इंद्रजीत चक्रवर्ती ईडीच्या कार्यालयातून घरी येत असतानाचा व्हिडीओ रियानं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात रियाचे वडील इंद्रजीत इमारतीच्या आवारात दिसत आहेत. त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला होता. 'हा व्हिडीओ माझ्या इमारतीच्या कंपाऊंडमधील आहे. त्या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती माझे वडील इंद्रजीत चक्रवर्ती (निवृत्त लष्करी अधिकारी) आहेत. आम्ही घराबाहेर पडून ईडी, सीबीआय आणि विविध तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय. पण माझ्या आणि कुटुंबाच्या जीविताला धोका आहे,' असं रियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओसोबत म्हटलं होतं.बघा, माझ्या घराखाली काय चाललंय; वडिलांची 'ती' ओळख सांगत रियानं शेअर केला व्हिडीओ
'आम्ही स्थानिक पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. आम्ही स्वत: तिथे गेलो. पण कोणतीही मदत मिळाली नाही. आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा, असं आवाहन आम्ही तपास यंत्रणांना केलं. पण तरीही मदत मिळाली नाही. आमचं कुटुंब कसं जगणार आहे? विविध तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी आम्ही मदत मागत आहोत,' असं रियानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केलं होतं. तपास यंत्रणांना योग्य सहकार्य करता यावं यासाठी मुंबई पोलिसांनी कुटुंबाला संरक्षण द्यावं, अशी मागणी रियानं केली होती.