Sushant Singh Suicide Case: "संदीप सिंहचा भाजपमधील हँडलर कोण? त्यानं ५३ कॉल कोणाला केले?"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 01:05 PM2020-08-29T13:05:55+5:302020-08-29T13:09:41+5:30
Sushant Singh Suicide Case: संदीप सिंहच्या भाजप कनेक्शनची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून जोरात राजकारण सुरू आहे. एका बाजूला सीबीआयचा तपास सुरू असताना दुसऱ्या बाजूला राज्य सरकार विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पेटला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात संदीप सिंहचं नाव समोर आलं. संदीप सिंहनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती केली होती. संदीपनं भाजप कार्यालयात वारंवार फोन केले होते. त्याच्यासोबत गुजरात सरकारनं करारदेखील केले होते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सुशांत प्रकरणाशी भाजपाचा संबंध काय?; काँग्रेसकडून फडणवीसांचा 'त्या' व्यक्तीसोबतचा फोटो शेअर
'संदीप सिंहनं (माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तो लंडनला पळून जाणार होता) भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयात १ डिसेंबर २०१९ पासून ५३ वेळा कॉल केले. तो नेमका कोणाशी बोलत होता? त्याचा भाजपमधील हँडलर कोण?', असा प्रश्न सावंत यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे. '२०१८ मध्ये भारतीय दूतावासाकडून आयोजित मॉरिशस भेटीदरम्यान एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप संदीपवर झाला. त्या प्रकरणाच्या चौकशीची सध्याची परिस्थिती काय? त्याला मोदी सरकार मदत करतंय का?,' असेही प्रश्न सावंत यांनी विचारले आहेत.
संदीप सिंहवरून सचिन सावंत यांनी भाजपला थेट लक्ष्य केलं आहे. 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीची निवड भाजपनं मोदींवरील बायोपिकची निर्मिती करण्यासाठी का केली? त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीदेखील पाठिंबा का दिला?,' अशी प्रश्नांची सरबत्ती सावंत यांनी केली आहे. 'मोदींवरील बायोपिक करणाऱ्या संदीप सिंहच्या लिजंड ग्लोबल स्टुडियोसोबत गुजरात सरकारनं व्हायब्रंट गुजरात समीटमध्ये १७७ कोटींचा सामंजस्य करार केला. या करारासाठी केवळ संदीपच्या कंपनीची निवड का झाली? इतरांची का झाली नाही? संदीप भाजपचा इतका लाडका कशामुळे झाला?', असे प्रश्न सावंत यांनी विचारले आहेत.
संदीप सिंहच्या भाजप कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी
सचिन सावंत यांनी काल संदीप सिंहचा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला. या प्रकरणातील भाजपाच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. 'सीबीआय ड्रग्ज प्रकरणात संदीप सिंहची चौकशी करणार आहे. संदीप सिंहनं मोदींच्या आयुष्यावरील बायोपिकचा निर्माता होता. त्या चित्रपटाचं पोस्टर देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं होतं,' असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यासोबतच त्यांनी ट्विटमध्ये पोस्टर लॉन्च कार्यक्रमातील फडणवीसांचा फोटोदेखील शेअर केला.
आता मलाही आत्महत्या करावीशी वाटतेय; याची जबाबदारी कोणाची?; रियाचा सवाल
सचिन सावंत यांनी फडणवीसांचा फोटो ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले. 'यामुळेच फडणवीस सरकारनं कोणत्याही चौकशीचे आदेश दिले नाहीत का? संदीप सिंहमुळेच या प्रकरणात घाईघाईनं सीबीआय आणि ईडीला आणलं गेलं का?,' असे प्रश्न सावंत यांनी विचारले. फडणवीस मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून संदीप सिंहच्या यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे या कनेक्शनची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सावंत यांनी केली.
आदित्य ठाकरेंबद्दल स्पष्टच बोलली रिया चक्रवर्ती; मोबाईलमधील AU चा अर्थही सांगितला