सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण: ‘त्या’ पाच प्रॉडक्शन हाऊसला समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:35 AM2020-06-18T02:35:50+5:302020-06-18T06:56:28+5:30
सुशांत याच्या मृत्यूपूर्वी त्याचे काही चित्रपट निर्माते तसेच कलाकारांशी वाद झाले होते. त्यानुसार त्याच्याकडून त्याच कारणामुळे मोठे सिनेमे काढून घेण्यात आल्याचे आरोप बॉलिवूडमधीलच अनेकांकडून करण्यात आले.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांमध्ये बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांचा हात असल्याची चर्चा आहे. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी त्या पाच प्रॉडक्शन हाऊसच्या मालकांना जबाब नोंदविण्यासाठी समन्स पाठवले असून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान त्याचा मोबाईलही फॉरेन्सिक लॅबला पाठवून देण्यात आला आहे.
सुशांत याच्या मृत्यूपूर्वी त्याचे काही चित्रपट निर्माते तसेच कलाकारांशी वाद झाले होते. त्यानुसार त्याच्याकडून त्याच कारणामुळे मोठे सिनेमे काढून घेण्यात आल्याचे आरोप बॉलिवूडमधीलच अनेकांकडून करण्यात आल्याने आता ‘जस्टीस फॉर सुशांत’ ही मागणी वाढत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील सुशांतच्या आत्महत्येबाबत योग्य तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. सुशांतकडून सात चित्रपट काढून घेण्यात आल्याचेही आरोप करण्यात आले आहेत, याची चौकशीही पोलीस करत आहेत. त्याच्या जवळच्या मित्रांसोबत त्याने केलेले चॅट मेसेजेस पोलिसांनी पाहिले. त्याच्याकडे शेवटच्या काळात काम नव्हते त्यामुळे आता आपले करिअर संपुष्टात येणार अशी भीती वाटल्यामुळेच तो तणावात गेला असावा असा संशय व्यक्त होत आहे.
त्याच्या मोबाइलचा पासवर्ड उघडण्यात तपास अधिकाऱ्यांना यश आले आहे. त्यानुसार मोबाइल आणि त्याचा लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आल्याचे समजते.
आतापर्यंत ११ जणांचे जबाब नोंदविले
पोलिसांनी त्याचे नातेवाईक आणि मित्र तसेच सहकारी असे ११ जणांचे जबाब आतापर्यंत नोंदविले असून त्याने मृत्यूपूर्वीच्या रात्री उशिरा महेश शेट्टी आणि मैत्रीण रिया चक्रवर्ती यांना पाच मिनिटांच्या फरकाने फोन केला होता जो त्यांनी उचलला नाही, हेदेखील उघड झाले आहे. सुशांतने १४ जून, २०२० ला वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.