Join us

सुशांत सिंहचे अनेक मित्र बनणार सरकारी साक्षीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:05 AM

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याच्या जवळचे अनेक ...

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याच्या जवळचे अनेक जण सरकारी साक्षीदार होण्यासाठी पुढे आले आहेत. सुशांतचा माजी अंगरक्षक सागर सोहिलनंतर येत्या काही दिवसांत सुशांतचे काही मित्रही साक्षीदार होण्यासाठी पुढे येण्याची शक्यता अमली पदार्थ नियंत्रण कक्षच्या (एनसीबी) सूत्रांनी वर्तविली.

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात गेल्या आठवड्यात त्याचे नोकर नीरज सिंह आणि केशव बचनेर, तसेच त्यानंतर गुरुवारी सुशांतचा अंगरक्षक सागर सोहिल सरकारी साक्षीदार झाला.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सागरची मालाडमध्ये एका ठिकाणी बुधवारी अनेक तास चौकशी केली. त्यानंतर, गुरुवारी सकाळी त्याला पुन्हा बोलावण्यात आल्यानंतर, त्याने आपल्याला साक्षीदार व्हायचे असल्याचे सांगितल्याने, त्याला किल्ला कोर्टातील न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले. तिथे त्याचा जबाब नोंदविण्यात आला.

गेल्या वर्षी १४ जूनला सुशांतचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी आतापर्यंत एनसीबीने एकूण ३५ जणांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेला सुशांतचा मित्र व रूम पार्टनर सिद्धार्थ पिठानीला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. त्यानंतर, केशव आणि नीरज यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. यानंतर, बॉडीगार्ड सागरला साक्षीदार करण्यात आले असून, तपासात त्याच्याकडून अनेकांची नावे एनसीबी अधिकाऱ्यांच्या समाेेर आली आहेत. त्यांना लवकरच समन्स बजावून चौकशीसाठी बोलवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...................................