मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अटकेची टांगती तलवार असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी सुशांतची बहीण प्रियंका सिंह, मितू सिंह यांच्यासह राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ. तरुण कुमार आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रियाच्या तक्रारीनुसार प्रियंकाने ८ जून रोजी सुशांतला राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून बनावट प्रिस्क्रिप्शन घेऊन पाठवले होते. या प्रिस्क्रिप्शनमध्ये त्या औषधांची नावे होती, जी अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत येतात आणि त्यांना बंदी आहे.
प्रियंकाच्या सांगण्यावरून सुशांतने घेतलेली हीच औषधे त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करत रियाने वकील सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत वांद्रे पोलिसांकडे लेखी तक्रार देत बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक आणि अमली पदार्थविरोधी कायदा व टेली मेडिसीन प्रॅक्टिस गाइडलाइन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी रात्री वांद्रे पोलिसांनी रियाचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. मुंबई पोलीस प्रवक्त्या पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी सीबीआयकडे वर्ग केल्याचे अंबिका यांनी स्पष्टकेले.
या कलमान्वये गुन्हा नोंद
भादंवी कलम ४२०, ४६४, ४६५, ४६६, ४६८, ४७४, ३०६, १२० आणि ३४ यासह अमली पदार्थविरोधी कायद्याच्या कलम ८ (क), २१, २२ (अ), २९ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.