Join us  

जातीय विखार... 'सटरफटर' म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 4:41 PM

सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यासंदर्भातील काही अनुभव शेअर केले आहेत

मुंबई - शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची भूमिका विषद केली. तसेच, सुषमा अंधारेंसंदर्भातील प्रश्नावर, सटरफटर लोकांमुळे नाराज व्हायची गरज नाही, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या त्यांना टोला लगावला. त्यानंतर, सुषमा अंधारेंनी ट्विट करुन नीलम गोऱ्हेंना शुभेच्छा दिल्या होत्या. आता, सुषमा अंधारे यांनी (अ) प्रिय नीलम ताई म्हणत सडेतोड पत्र नीलम गोऱ्हेंना लिहिलं आहे. 

शिवसेना पक्षात सुषमा अंधारे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली. दसरा मेळाव्यात सुषमा अंधारेंचं भाषण, तिथेच उपनेते पदाची जबाबदारी आणि राज्यभर सभांसाठी दौऱ्याचे नियोजन यामुळे शिवसेनेतील महिला नेतृत्त्व नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. त्यातच, आमदार मनिषा कायंदे यांनीही सुषमा अंधारेंच्या प्रवेशावरील आपली नाराजी जाहीर करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी, त्यांनीही सुषमा अंधारेंवर प्रत्यक्षपणे टीका केली होती. आता, नीलम गोऱ्हे यांनीही सुषमा अंधारेंवरील प्रश्नावर उत्तर देताना, सटरफटर म्हणत त्यांना बेदखल केलं. त्यावर, आता सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंच्या मानसिकेतवरच टीपण्णी केली आहे. तसेच, नीलम गोऱ्हे या जातीय, भणंग आणि कफल्लक आहात, अशा शब्दात त्यांच्यावर जोरदार प्रहार केलाय.  

सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यासंदर्भातील काही अनुभव शेअर केले आहेत. तसेच, त्या जातीय विखार सांगणाऱ्या असल्याची घणाघाती टीकाही सुषमा अंधारे यांनी केलीय. 

तुम्हाला राजकिय जन्म प्रकाश आंबेडकरांनी दिला पण समोर संधी दिसताच तुम्हाला त्याचा ही विसर पडला. कालचा तुम्ही केलेला उल्लेख ही तुमच्यातला काठोकाठ भरलेला जातीय विखार सांगणारा होता. तुम्ही भलेही कितीही पदे भोगली (हो भोगलीच, भूषवली नाही) असतील पण माणूस म्हणून तुम्ही कमालीच्या भणंग आणि कफल्लक आहात. कारण ना तुम्ही कुणाला मदतीचा हात देवू शकता ना कुणाचा उत्कर्ष बघु शकता ना उपकार कर्त्याची जाणीव ठेवू शकता. तुम्ही राहता त्या मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर मध्ये ना साधी एक शाखा काढू शकलात ना , एखादा नगरसेवक निवडून आणू शकलात. महापालिकेत नगरसेवक म्हणुन निवडून येण्याचा वकूब नसताना ज्या पक्षाने एवढं दिलं तो पक्ष आणि कुटुंब  संकटात असताना,  सत्तेसाठी पळ काढला. पण, कुठलेही सत्तास्थान नसताना आमच्यासारखे निष्ठावान ठामपणे मातोश्रीसोबत निकराची झुंज देत आहेत. अन् तुमच्यासारखे खुर्च्या टिकवण्यासाठी छळ कपट करणाऱ्यांची भाटगिरी करत आहेत, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवर प्रहार केलाय. 

अंधारेंकडून मंत्रीपदासाठी शुभेच्छा

''तब्बल पाच वेळा विधानपरिषद आणि आता उपसभापती पद भूषवणाऱ्या पुरोगामी (?) नीलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्यमंत्री पदासाठी ऍडव्हान्समध्ये अभिनंदन'', असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले आहे. सुषमा अंधारे यांनी एकप्रकारे नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत का गेल्या, हेही ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

... म्हणून मूळ शिवसेनेत पक्षप्रवेश, अंधारेंवरही बोचरी टीका

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचे कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितले. तसेच, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन ही शिवसेना पुढे जात असून हीच खरी शिवसेना असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. शिवसेनेत मी चांगलं काम केलं आहे. पण आता राष्ट्रीय भूमिका आणि राज्यातले प्रश्न यासाठी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मी घेतला, असेही त्यांनी म्हटले. तसेच, उपस्थित पत्रकारांनी सुषमा अंधारेंबद्दल प्रश्न विचारला असता, सटरफटर लोकांमुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नसते, असेही गोऱ्हे यांनी म्हटले.

टॅग्स :नीलम गो-हेसुषमा अंधारेशिवसेनापुणे