मुंबई-
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवनेरी गडावर आज राज्याच्या पर्यटन विभागाकडून शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी छत्रपती शिवरायांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. फितुरांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जात आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी पत्रातून केली आहे.
तसंच शिवरायांच्या हयातीत गद्दार ताठ मानेनं फिरतोय असं कधी घडलं नाही. पण यापुढे आता पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही असं वचन आम्ही तुम्हाला देतो, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सरकारला रोखठोक आव्हान दिलं आहे.
सुषमा अंधारेंनी लिहिलेलं पत्र...
आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,
आम्हाला माफ करा..आज तुमच्या जन्मदिनी,स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय..
तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय, असे कधीही घडले नाही... पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही,असे वचन आम्ही तुम्हाला देतो..
शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच, फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या! स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या! आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या!
हर हर महादेव !!तुमचा खरा मावळा,सच्चा शिवसैनिक.