मुंबई- सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळाला आहे. चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपविली. प्रवेश करताच सुषमा अंधारेंना उपनेतेपदाची जबाबदारी मिळताच त्या भावूक झाल्याचे दिसून आले. मात्र एकेकाळी शिवसेनेवर बोचरी टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण सांगितलं आहे.
ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करून संविधानिक चौकट तोडली जात आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, माझं हिंदुत्व हे शेंडी आणि जानव्याचे नाही. तेव्हा मी ठरवलं की, आता शिवसेनेत जायचे. माझ्या डोक्यावर कुठल्या ईडीचं ओझं नाही आणि मला कुठलेही प्रलोभन नाही, असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळाला-
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजप सोबत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिव शक्ती –भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे. सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या घोषणेनंतर त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेली भाषणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या भाषणांमध्ये सुषमा अंधारे यांनी जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर टीका केल्या आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या प्रचार सभांमध्ये सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला होता.