मुंबई - राज्यातील राजकारण गेल्या ५ वर्षात अनेकदा वेगळ्याच वळणावर गेल्याचं पाहायला मिळालं आहे. आधी महाविकास आघाडीची स्थापना अन् मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे. त्यानंतर, शिवसेनेतील मोठी बंडखोरी अन् मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंसह महायुतीचं सरकार स्थापन. त्यानंतर, महायुतीसोबत अजित पवार यांनी सोबत अन् राष्ट्रवादीत पडलेली फूट. राज्याच्या राजकारणातील या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकही अवाक् झाला आहे. मात्र, ही एकजूट आता पक्षांतर्गत मतभेदाला कारणीभूत ठरताना दिसत आहे. त्याच अनुषंगाने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर करत महायुतीतील दाटीवाटीवर हल्लाबोल केला आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहात होती. या विस्तारासाठी अनेकदा तारखाही निश्चित झाल्या. मात्र, अचानक अजित पवार गटाची एन्ट्री झाली अन् राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यामुळे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार वेटींग लिस्टमध्येच अडकून पडले. आता लोकसभा निवडणुकांना अवघे २-३ महिने बाकी आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने आमदारांची नाराजी उघड होताना दिसून येते. तीन पक्ष एकत्र आल्याने संधी कमी झाल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी वाढत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एकाच कारमध्ये दाटीवाटीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, २ उपमुख्यमंत्री आणि १ मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बसल्याचं पाहायला मिळत आहे. अंधारे यांनी एक वाक्य लिहून या व्हिडिओवर खोचक टोलाही लगावला आहे. तसेच, शिवसेनेतील बंडावर भाष्य करताना गुवाहटीच्या दौऱ्यावरुन चिमटाही काढला.
जर केली नसती सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी..! असे स्लोगन सुषमा अंधारे यांनी या व्हिडिओसोबत लिहिले आहे.