शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. संतांच्या बाबतीत केलेल्या विधानासंदर्भात सुषमा अंधारे यांच्याविरोधात राज्यभर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. संतांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून विश्व वारकरी संघ चांगलाच आक्रमक झाला आहे.
सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महानुभाव संप्रदायात संतापाची लाट असून अंधारे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ भगवान श्रीकृष्णासमोर घेण्याची मोहीम गावोगावी राबवली जाणार आहे. याची सुरुवात औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमातून झाली आहे. याचदरम्यान सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे.
माझ्यासाठी माझा पक्ष महत्त्वाचा आहे. मला पक्षासाठी काम करायचं असेल तर मी कुठूनही करू शकते. मी जर पक्षाबाहेरून काम केलं तर भाजपासाठी पळता भुई थोडी करेन, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे. तसेच पक्षाने आदेश दिला, तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र माझा राजीनामा घेण्याआधी तुम्ही राज्यपालांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जातात, मग हे लोक मधले १० ते १५ वर्ष हे कुठे गेले होते?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, वारकरी संतांच्याबाबत वक्तव्यानंतर काल सुषमा अंधारे यांनी माफी मागितली असली तरी यावर वारकरी संप्रदायाचे समाधान झालेले नसून त्यांचे विरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व वारकरी संघाच्या तुकाराम चौरे महाराज यांनी केली आहे. तसेच राज्यभर सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी विश्व वारकरी संघाने सुरु केल्याचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी जाहीर केले आहे.
वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्ये केली तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला आहे. तसेच राज्यातील ३६ जिल्हे आणि २७० तालुक्यात पसरलेल्या या संघटनेने आपल्या गावोगावच्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारे यांच्या विरोधात तक्रार देण्याच्या सूचना दिल्याचे जगन्नाथ महाराज देशमुख यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"