Join us  

सुषमा अंधारेंचा मतदारसंघ ठरला?; आमदारकी नाही, थेट खासदारकीच लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 9:56 AM

गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती मतदारसंघात पराभव पत्कारावा लागला होता.

मुंबई - शिवसेना पक्षात मोठी बंडाळी झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले. शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक नेते मंडळींनीही शिंदेसोबत जाणं पसंत केलं. याच काळात अनेकांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातही प्रवेश केला. त्यामध्ये, सुषमा अंधारे यांचाही प्रवेश झाला. विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांना थेट शिवसेनेच्या उपनेतेपदी बसवण्यात आलं. त्यातच, दसरा मेळाव्यातील त्यांच भाषण आणि महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून त्यांनी शिंदे गटाविरुद्ध रान उठवलं. आता, त्यामुळेच, शिवसेनेकडून त्यांना थेट लोकसभेचं तिकीट देण्यात येणार असल्याचं समजतं. 

गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती मतदारसंघात पराभव पत्कारावा लागला होता. विशेष म्हणजे अमरावती मतदारसंघाच्या खासदार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या, पण त्यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यातच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना नेतृत्त्वाविरुद्ध रणशिंग फुंकले होते. हनुमान चालिसा पठन करण्यावरुन खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला आव्हानच दिलं होतं. त्यानंतर, राज्यभर राणा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला. तर, राणा दाम्पत्य अद्यापही शिवसेना पक्षप्रमुखांवर सातत्याने टीका करतं. त्यामुळे, शिवसेनेनं राणा यांच्याविरुद्ध लोकसभेच्या मैदानात सुषमा अंधारेंना उतरवण्याचं ठरवलं आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. केवळ १९९८ चा अपवाद वगळता १९६६ ते २०१९ पर्यंत शिवसेनेनंच अमरावती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. आता विद्यमान खासदान नवनीत राणा यांना त्यांच्या मतदारसंघात गुंतवून ठेवण्याची खेळी ठाकरे गटानं केलीय. त्यासाठी, ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंना अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :सुषमा अंधारेनिवडणूकलोकसभाअमरावतीनवनीत कौर राणा