मुंबई/बीड - शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्या शिवसेना पक्षातून राजकारणात सक्रीय झाल्यापासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यामुळेच, त्यांचे विभक्त पती वैजिनाथ वाघमारे हेही चर्चेत आले. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला असतानाच, सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तर, सुषमा अंधारे यांनीही कौटुंबिक वादावर स्पष्टपणे आपली भूमिका यापूर्वीच मांडली आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री वैजिनाथ वाघमारे यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञातांकडून हा हल्ला झाल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येते.
बीड जिल्ह्यातील केज-आडस भागात त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे, हल्ल्यानंतर ते चांगलेच भयभीत झाले आहेत. वाघमारे यांनी आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचं सांगत कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणीही केली आहे. मात्र, या हल्ल्यानंतर बीडमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. नगर जिल्ह्यात समाजाची बैठक संपवून घरी जात असताना काही हल्लेखोरांनी वाघमारे यांची गाडी केज-आडस गावाजवळ रस्त्यात अडवली. यावेळी, अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या दगडांच्या माऱ्यामुळे वाघमारे चांगलेच भयभीत झाले होते.
दरम्यान, मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी मी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, मात्र माझ्या मागणीची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. त्यामुळेच, आज आमच्या गाडीवर हल्ला झाल्याचं वाघमारे यांनी म्हटलंय.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजिनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीचे नेतृत्व असून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका असल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. माझी राजकीय पार्श्वभूमी नाही पण सामाजिक कार्य करत आलोय. आमचे नेते एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती पार पाडू, असं विधान वैजनाथ वाघमारे यांनी केलं होतं.