मुंबईः देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, धडाकेबाज पराक्रम आणि अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करताना उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती हरपल्याची त्यांनी भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका अभ्यासू आक्रमक पर्वाचा अंत झाला आहे. हरियाणात वयाच्या २५ व्या वर्षी कॅबिनेटमंत्रीपद, २७ व्या वर्षी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रात परराष्ट्र खात्यासह महत्वाच्या पदाचे यशस्वी काम पाहणाऱ्या सुषमा स्वराज यांनी राजकारणात खूप कमी वयात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. सुषमा स्वराज नेहमीच म्हणायच्या की, राजकारण हे करियर म्हणून नव्हे, तर मिशन म्हणून आपण स्वीकारले आहे. घर आणि राजकारण यात कुणालाही प्राधान्य देण्याऐवजी मी यात संतुलन साधले आहे.
हरियाणा हे राज्य स्त्रियांच्या बाबतीत जुनाट रुढीवादी. इथल्या स्त्रिया सार्वजनिक जीवनात अभावानेच दिसतात. अशा परिस्थितीतही सुषमा स्वराज यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जी झेप घेतली ती निश्चितच कौतुकास्पद होती. चंदीगडमधील पंजाब विद्यापीठात शिकताना सुषमा स्वराज यांचा ओढा मार्क्सवादी साहित्याकडे होता. समाजवादी विचारांच्या स्वराज कौशल यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती मिझोरामचे राज्यपालही होते. बांसुरी ही त्यांची एकुलती एक मुलगी. सुषमा आणि स्वराज कौशल हे दोघेही व्यवसायाने वकील.
घरची जबाबदारी सांभाळून पक्षकार्यकर्त्या, पक्षाच्या सरचिटणीस, प्रवक्त्या, प्रचारक, केंद्रीय मंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्री, केंद्रात कॅबिनेट मंत्री अशा अनेक जबाबदाºया त्यांनी पार पाडल्या. आपल्या आक्रमक भाषणांमुळे सुषमा स्वराज संसदेच्या सभागृहात नेहमीच चर्चेत रहायच्या. निवडणूक प्रचार असला की, भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून सुषमा स्वराज यांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह असायचा. आपल्या अभ्यासू आणि आक्रमक भाषणातून त्या विरोधकांवर तूटून पडत असत.