मुंबई - माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाबाबत सर्व स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असल्याचं राज यांनी सांगितले.
तसेच विचारधारा वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुषमाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (६७) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. सुषमा स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती.
सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.
काश्मीरबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर सुषमा स्वराज यांनी मंगळवारीच ट्विट केले होते की, पंतप्रधानजी, आपले हार्दिक अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही तासांतच म्हणजेच रात्री साडेनऊ वाजता हृदयविकारामुळे सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्ष वर्धन आणि भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये धाव घेतली. रात्री उशिरा एम्सने सुषमा स्वराज यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
ट्विटरवर आलेल्या तक्रारींचं तात्काळ निरसन करणे, परदेशात राहणाऱ्या भारतीयांना काही अडचण आली की स्वराज त्यांच्या मदतीला धावून जाणे यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. सुषमा स्वराज यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे.