स्फोटांतील संशयिताला शहापूरमधून अटक
By admin | Published: January 5, 2016 03:01 AM2016-01-05T03:01:33+5:302016-01-05T03:01:33+5:30
दोन वर्षांपूर्वी दिल्ली आणि जयपूरमध्ये एकाच वेळी स्फोट झाले होते. या स्फोटांच्या मालिकेतील संशयित राजू उर्फ दीपक शुक्ला (३४) याला मुंबई एटीएसच्या
शहापूर : दोन वर्षांपूर्वी दिल्ली आणि जयपूरमध्ये एकाच वेळी स्फोट झाले होते. या स्फोटांच्या मालिकेतील संशयित राजू उर्फ दीपक शुक्ला (३४) याला मुंबई एटीएसच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी शहापूरमधून अटक केली. पंडितनाका येथे मोबाइल, तसेच इलेक्ट्रॉनिक व हारफुलांचे दुकान चालविणाऱ्या सतीश विशे याच्याशी राजूने मैत्री केली. सतीशच्या मोबाइलवरूनच राजू महाराष्ट्राबाहेर फोन करत असे. त्या फोन कनेक्शनचा आधार घेत, एटीएसचे पथक तपासासाठी शनिवारी शहापूरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सतीशलाच ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर राजू उर्फ दीपकचे नाव पुढे आले होते. रविवारी नेहमीप्रमाणे सतीशच्या दुकानात आलेल्या राजूस कांबारे गावचे पोलीस पाटील सुभाष विशे व इतरांनी कांबारे गावात नेऊन कोंडून ठेवले. त्यांनी एटीएसला खबर दिल्याने सोमवारी त्याला ताब्यात घेतले. एटीएसच्या सूत्रांनुसार दिल्ली, जयपूर येथील स्फोटांमध्ये, तसेच इतर महत्त्वपूर्ण गुन्हेगारी घटनांमध्ये त्याचा संशयास्पद सहभाग असल्याचे सांगण्यात आले. लघुउद्योगांचे जाळे पसरलेल्या आटगाव येथे रोजगारासाठी मोठ्या संख्येने परप्रांतीय वास्तव्यास आहेत. तेथेच राजू उर्फ दीपक शुक्ला दोन वर्षांपासून राहत होता. येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवल्याने दिल्ली पोलिसांनाही चकवा देणारा राजू उर्फदीपक मुंबई एटीएसच्या हाती लागला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी सतीशला सोडून दिले. (वार्ताहर)