Join us

सनातनच्या साधकाकडून 8 देशी बाँबसह स्फाेटकाचे साहित्य जप्त; सनातनने आरोप फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 6:56 AM

गन पावडर आणि डिटोनेटरचा समावेश, मोठ्या घातपाताच्या तयारीचा संशय

मुंबई- दहशतवाद विरोधी पथकानं एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ताे सनातनचा साधक असल्याचे सांगितले जात आहे. त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानं दहशतवादविरोधी पथकाच्या साहाय्यानं पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून आणि जवळच असलेल्या दुकानातून बाॅम्ब बनविणण्याचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान, सनातनच्या वकिलांनी हा आराेप फेटाळला आहे.

वैभव राऊतच्या घरात जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद वस्तू

जप्त करण्यात आलेल्या सामग्रीमध्ये गन पावडर आणि डिटोनेटरचा समावेश आहे. त्यांच्यापासून दोन डझनहून अधिक बॉम्ब बनविता येऊ शकतात. 

वैभव राऊतने ही स्फोटके का आणि कशी जमा केली? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. विशेष म्हणजे सामग्री सापडल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढली आहे. वैभव हा सनातनी विचारधारेचा असून कुठे घातपात करण्याच्या तयारीत नव्हता ना, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतू, एटीएसचे पथक गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर सतत पाळत ठेऊन होते. शेवटी गुरवारी रात्री त्याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याच्या घरी कसून तपासणी सुरू आहे. डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहे.

नालासोपा-यात काल रात्री दहशतवादविरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दहशतवादीविरोधी पथकाच्या छाप्यात 8 देशी बॉम्बसह स्फोटकं बनवण्याचं साहित्य सापडलं आहे. नालासोपा-यातील भांडार आळी भागात राहणा-या वैभव राऊत याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संशयितावर पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाची टीम पाळत ठेवून होती. अखेर त्याच्या घरावर छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.  ताे सनातन या संस्थेचा साधक असल्याचे समजते. 

 दरम्यान, सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. सनातनला बदनाम करण्याचा गृहमंत्र्यांचा डाव असल्याचे सांगत सनातन संस्थेवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याचबराेबर वैभवची बाजुही त्यांनी मांडली. वैभवच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद असून वैभवला शक्य ती सर्व मदत करु, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :स्फोटमुंबईमुंबई पोलीस