मुंबई : पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसली असून सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
श्रीलंकेतील साखळी बॉम्ब हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर सतर्कता बाळगण्यात येत आहे. ही बोट श्रीलंकेच्या समुद्रातून पालघरच्या समुद्रात आल्याचे समजते. या बोटीवर अन्न धान्य आणि अन्य वस्तूंचा साठा आहे. यामुळे तटरक्षक दलाने पालघरच्या मच्छीमारांशी सकाळीच बैठक घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.
तटरक्षक दलाच्या प्रवक्त्यानुसार मच्छीमारांना यासंबंधीची माहिती देण्यात आली असून त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच काही हालचाली दिसल्यास तटरक्षक दल किंवा पोलिसांना लागलीच कळविण्यास सांगितले आहे.
मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी भर समुद्रातच भारतीय बोटीवर ताबा मिळवत हल्ला केला होता. यामुळे मच्छीमारांना सतर्क करण्यात आल्याचे समजते.