Join us

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेली संशयित कार; गाडीत धमकीचे पत्रही सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 1:17 AM

गाडीत आढळल्या जिलेटीनच्या तब्बल २० ते २५ कांड्या

मुंबई : रिलायन्स ग्रुपचे प्रमुख, प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अल्टामाऊंट रोडवरील अँटिलिया निवासस्थानाजवळ २० ते २५ जिलेटीनच्या कांड्या ( स्फोटके) असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्याने गुरुवारी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ हा परिसर सील करून तपासाची चक्रे गतिमान केली. या गाडीमध्ये धमकीची चिठ्ठी आढळून आली आहे. 

उद्योगपती अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ संशयास्पद वाहन उभे असल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी दुपारच्या सुमारास मिळाली. घटनेची माहिती मिळताच गावदेवी पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, फाँरेन्सिक पथक, श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास केल्यानंतर वाहनात २० जिलेटीनच्या कांड्या मिळाल्या. अंबानी यांच्या बंगल्यापासून जवळच हे वाहन उभे होते.  स्फोट होण्यासाठी जिलेटीनच्या कांड्या एकत्रित जोडलेल्या नव्हत्या. अधिक तपास सुरू आहे, असे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

पोलिसांकडून अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गुन्हे शाखा याबाबत अधिक तपास करीत आहे. बुधवारी मध्यरात्री ही गाडी तेथे आल्याची माहिती मिळते आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने गुन्हे शाखा त्याची खातरजमा करीत आहे.  गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास या गाडीचा ताबा पोलिसांनी घेतला. 

अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचे सांगितले जात आहे. व्हीआयपी रस्ता, श्रीमंताची रेलचेल असलेला परिसर म्हणून पेडर रोड, कारमायकेल रोड आणि अल्टामाउंट रोड ओळखले जातात. ही स्कॉर्पिओ कारमायकेल रोडवर उभी होती. तेथून उद्योगपती मुकेश अंबानी यांची  अँटिलिया ही इमारत अतिशय जवळ आहे. 

रात्री गाडी उभी केली!

बुधवारी रात्री उशिरा तिथे गाडी उभी करण्यात आली होती. या गाडीत काही स्फोटके होती आणि गाडीत वेगवेगळ्या नंबरप्लेटही पोलिसांना सापडल्या. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीप्रमाणे, तिथे दोन गाड्या आल्या होत्या. दुसऱ्या गाडीबाबत अद्याप माहिती समजलेली नाही.

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अल्टामाऊंट रोडवरील घरापासून काही अंतरावर एका गाडीत जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. मुंबई पोलीस त्याची सखोल चौकशी करीत आहेत.    - अनिल देशमुख, गृहमंत्री

सीसीटीव्ही ताब्यात 

मध्यरात्री एक वाजता कारमायकेल  रोड परिसरात ही गाडी पार्क करण्यात आली. गाडीतून उतरलेली व्यक्ती पाठीमागून आलेल्या दुसऱ्या गाडीत बसली. फ्लॅश लाईट ऑन केल्यामुळे गाड़ीचा क्रमांक सीसीटीव्हीत स्पष्ट दिसला नाही. परिसरातील अन्य सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकड़ून ताब्यात घेण्यात येत आहे.

 जिलेटीनच्या कांड्या किती घातक?

खाणकाम, विहिरी खणणं, मोठमोठे दगड फोडणे किंवा दगड खाणींमध्ये जिलेटीनचा वापर होतो. लांबून वात पेटवून स्फोट घडवून, दगड फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. एका जिलेटीनच्या कांडीत भीषण स्फोटाची क्षमता असते. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ तर २० ते २५ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या कांड्यांची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो. 

टॅग्स :मुकेश अंबानीमुंबई पोलीसपोलिस