बोगस लसीकरण प्रकरण; एसआयटी स्थापन, १० आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बनावट लसीकरण रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर याप्रकरणात आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करत, एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती पाेलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. यात प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीत लसींच्या नावाखाली ग्लुकोजच्या पाण्याचा वापर केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल गुणांच्या नावाखाली प्रशिक्षण देत त्यांचाही यात वापर करण्यात आला होता.
कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज येथील लसीकरण घोटाळा उघडकीस आल्यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवत आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ४० हजार रुपये जप्त करण्यात आले. तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याचसोबत, फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट औषधांसदर्भातील गुन्हे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कलमांचाही यात समावेश करण्यात आला आहे, तर आतापर्यंत याप्रकरणी एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अशाप्रकारे फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत कांदिवलीसह बोरीवली, वर्सोवा, खार, भोईवाडा, बांगुरनगर पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आलेत. समतानगर आणि अंधेरीतही असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २००पेक्षा अधिक लोकांचे जवाब नोंदवले आहेत. ११४ बनावट प्रमाणपत्रही जप्त करण्यात आले आहेत.
या टोळीने एकूण १ हजार ३४३ लोकांचे बोगस लसीकरण केले. अटक आरोपींमध्ये महेंद्र प्रताप सिंह (३९), संजय गुप्ता (२९), चंदन सिंह (३२), नितीन मोंडे (३२), मोहंमद करीम अकबर अली (१९), गुडिया यादव (२४), शिवराज पटारिया (६१), नीता शिवराज पटारिया (६०), श्रीकांत माने (३९) आणि सीमा अहुजा (४२) यांचा समावेश आहे. ही मंडळी एकदा लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरत असल्याची माहिती समोर येत आहे. लसींच्या नावाखाली नेमके काय दिले? याबाबत अधिक तपास सुरू आहे.
महेंद्र हा नऊ बनावट लसीकरण शिबिरांचा प्रमुख असून, संजय हा सर्व गुन्ह्यात सहआरोपी आहे. राजेश हा कोकिलाबेन रुग्णालयाला सेल्स अधिकारी होता. यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला कामावरून काढण्यात आले. याशिवाय, चंदन रामसागर हा डेटा सेंटरमधील कर्मचारी आहे. त्याला मॅनेज करून हे सर्व काम सुरू होते. गुडिया यादव, डॉ. पटारिया यांचा सहभागही निश्चित करण्यात आला आहे. या संपूर्ण गुन्ह्यांचा बारकाईने तपास होणे अपेक्षित असल्याने एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले.
* असे करायचे फसवणूक
एखाद्या कंपनीला किंवा सोसायटीला लसीकरण करून घ्यायचे आहे का, याची माहिती गोळा करायचे. त्यानुसार कॅम्प आयोजित करून या टोळी कडून लसीकरण केले जात होते. लसीकरण करण्यासाठी लसींचा पुरवठा हा शिवम हॉस्पिटल, चारकोप, कांदिवली येथून केला जात होता. याचे मालक शिवराज पटारिया आणि त्यांची पत्नी नीता पटारिया आहेत. त्यांनी मुदत संपलेल्या लसी दिल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये मुख्य आरोपी महेंद्र सिंह असून, त्यानेच हा सर्व प्लॅन आखल्याचे समाेर आले आहे.
.........................