महाराष्ट्रात गोवरच्या संशयित रुग्णांनी पार केला १० हजारांचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:17 AM2022-11-27T10:17:01+5:302022-11-27T10:17:29+5:30
राज्यभरात १३ मृत्यू; ६५८ रुग्णांचे निदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात सुरू झालेल्या गोवरच्या उद्रेकानंतर आता राज्यातही या आजाराची स्थिती गंभीर होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, राज्यात शुक्रवारपर्यंत गोवराच्या संशयित रुग्णांची संख्या १० हजार २३४ वर गेली असून निश्चित झालेले रुग्ण ६५८ आहेत. तर आतापर्यंत एकूण १३ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ९ संशयित आहेत, चार मृत्यूंची निश्चिती झाली आहे.
गोवर उद्रेक प्रतिबंध व नियंत्रणासंदर्भात शुक्रवारी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आढावा घेतला. यावेळी, राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत आंतरविभागीय समन्वयाने राज्यात गोवर प्रतिबंधाचा निर्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोवराच्या रुग्णांचे रिपोर्टिंग वाढवण्यासाठी खासगी क्षेत्र, आयएमए आणि आयपीसारख्या संस्थांची मदत घेण्यासही सांगितले आहे.
जिल्हा, महानगरपालिकांना मार्गदर्शक सूचना
राष्ट्रीय गोवर विषयक तज्ज्ञ समितीने गोवर प्रतिबंध आणि नियंत्रण यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार, आरोग्य विभागासह अन्य शासकीय विभागांतून मदत मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. जिल्हा/ उपजिल्हा टास्क फोर्सच्या बैठका, उद्रेक झालेल्या भागांत विशेष लसीकरण, अतिजोखमीच्या भागांना प्राधान्य, बालवाड्या-पाळणाघरात लसीकरण इतिहास तपासणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
गोवरमुळे झालेले मृत्यू १३
वयोगट मृत्यू
० ते ११ महिने ३
१२ महिने ते २४ महिने ८
२५ महिने ते ६० महिने २
लसीकरण : यापैकी एका बालकाने गोवर लसीचा एक डोस घेतलेला आहे. इतरांनी लस घेतलेली नाही.
अधिक रुग्ण असल्यास अतिरिक्त लसीकरण
उद्रेकग्रस्त भागातील ९ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांचे लसीकरण त्वरित पूर्ण करण्यात यावे. तसेच, ज्या भागातील उद्रेकात नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तेथे ६-९ महिन्यांच्या बालकांना एमआर लसीचा एक अतिरिक्त डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.