चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसालाच अटक, विनयभंगाच्या गुन्ह्यांत होता निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:49 AM2018-04-14T02:49:38+5:302018-04-14T02:49:38+5:30
विनयभंगाच्या गुन्ह्यात निलंबित केलेल्या पोलीस शिपायाला भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. अक्षय चौगुले (२६) असे अटक पोलीस शिपायाचे नाव आहे.
मुंबई : विनयभंगाच्या गुन्ह्यात निलंबित केलेल्या पोलीस शिपायाला भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. अक्षय चौगुले (२६) असे अटक पोलीस शिपायाचे नाव आहे. ३ मोबाइल आणि रोकड घेऊन पळण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
चौगुले हा नायगावच्या सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. गेल्या वर्षी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला होता. याच गुन्ह्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव येथील केनी चाळ परिसरात मध्यरात्री दीड ते पावणे दोनच्या सुमारास सुनीता वारखे (४७) यांच्या घरात चौगुले घुसला. त्या एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. पहाटे नेहमीप्रमाणे मोबाइलमधील अलार्म वाजला नाही म्हणून त्यांनी मोबाइलचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना मोबाइल दिसून आला नाही. मोबाइल चोरी झाल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी मुलगा प्रतीकला याबाबत सांगितले.
मध्यरात्री दीडच्या सुमारास सुनीता या नैसर्गिक विधीसाठी उठल्या तेव्हा दरवाजा उघडून त्या बाहेर गेल्या होत्या. पावणे दोनच्या सुमारास त्या घरात आल्या. त्याचदरम्यान ही चोरी झाल्याचा संशय प्रतीकला आला. रात्री उशिराने चौगुले हा इमारतीखाली संशयास्पद फिरत असल्याचे प्रतीकने पाहिले होते. त्याने मित्रांना याबाबत सांगत चौगुले पळण्याच्या तयारीत असताना त्याला पकडले.
घटनेची वर्दी लागताच, भोईवाडा पोलिसांनी चौगुलेला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत ३ मोबाइल आणि रोकड आढळून आली. या गुन्ह्यांत चौगुलेला अटक करण्यात आली आहे.