लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्ली पोलिसांनी धारावी परिसरामध्ये राहणाऱ्या जान मोहम्मद अली मोहम्मद शेख या संशयित दहशतवाद्याला अटक केल्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखांनी (एटीएस) बुधवारी पत्रकार परिषद घेत जान एटीएसच्याही रडारवर असल्याचे बुधवारी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद गँगशी जान याचा २० वर्षांपूर्वी संबंध होता असा खुलासाही यावेळी करण्यात आला. जानच्या चौकशीसाठी एटीएसचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.
दिल्ली पोलिसांनी कारवाई करत एकूण सहा संशयित दहशतवाद्यांंना अटक केली असून, त्यापैकी जान मोहम्मद हा मुंबईच्या धारावी परिसरातील राहणारा आहे. एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जान १३ तारखेला मुंबईतून एकटाच निजामुद्दीनसाठी निघाला. याचदरम्यान राजस्थानच्या कोटा स्थानकात त्याला दिल्ली पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे कुठलेही शस्त्र मिळाले नाही.
मुंबईत रेकी झालीच नाही
- दिल्ली पोलिसांनी या सहा दहशतवाद्यांना मुंबईत रेकी करण्यापूर्वी अटक केली. आम्ही दिल्ली पोलिसांच्या संपर्कात असून आम्ही त्यांच्यासोबत मिळून कारवाई करू.
- पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेला एक माणूस आला आणि त्याने रेकी केली, ही बाब पूर्णपणे चुकीची असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
दहशतवाद्यांच्या अटकेचे राजकारण कशाला?
- दहशतवाद्यांची अटक हा संवेदनशील विषय आहे, त्यात भाजपने राजकारण करू नये, असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लगावला.
- भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुंबईत दहशतवाद्यांची कारस्थाने सुरू असताना महाराष्ट्र एटीएस पथक झोपले होते का? असा सवाल केला आहे.