* समीर कालियाचा सहकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांशी संबंधित आणखी एका तरुणाला मुंबई एटीएसच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. झाकीर हुसेन शेख असे त्याचे नाव असून मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्या मदतीने जोगेश्वरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. झाकीर हा दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या धारावीतील जान मोहम्मदचा साथीदार असून तो घातपात घडविण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरविणार होता, असे सांगण्यात येते.
जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएस झाकीर शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तो पसार होण्याच्या प्रयत्नात होता. त्याने पत्नीला वांद्रे येथील एका नातेवाइकाकडे पाठविले होते. त्याची माहिती मिळताच एटीएसने क्राइम ब्रँचच्या मदतीने सापळा रचला. त्याच्या पत्नीच्या मदतीने झाकिरला फोन करून जोगेश्वरी परिसरात बोलावून अटक केली.
त्यानंतर त्याला नागपाडा एटीएस कार्यालयात चौकशीसाठी आणले होते. चौकशीनंतर त्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याचे समजते. जान मोहम्मद आणि त्याच्यातील संबंधाबाबत माहिती घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कारवाई
चार दिवसांपूर्वी जान मोहम्मद शेखसह इतर पाच दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. एकाच वेळेस महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ही कारवाई करण्यात आली होती. जान मोहम्मद हा गेल्या २० वर्षांपासून दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित होता. सध्या तो अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. दिल्ली पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आल्याने त्याची महाराष्ट्र एटीएसने गंभीर दखल घेत त्याचा स्वतंत्र तपास सुरू केला होता. त्यामध्येच आता आणखी एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे.