मुंबई : पाकिस्तानमधून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन, मुंबईत आलेल्या फैसल मिर्झा (३१) या संशयित अतिरेक्याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दोन दिवसांपूर्वी जोगेश्वरीतून अटक केली. मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरेकी कारवाया करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्याने दिली आहे. न्यायालयाने त्याला २१ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.पोलिसांनी फैसलकडून संशयास्पद कागदपत्रे व साहित्य जप्त केले आहे. कटाबद्दलचा तपशील आणि त्याच्या अन्य साथीदारांची माहितीही घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबई व कोलकाता एटीएस आणि जुहू पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पश्चिम उपनगरात राहत असलेल्या फैसल यास मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील फरारी व पाकिस्तानात राहत असलेल्या आरोपीने बोलावून घेतले होते. दुबईतील शारजाह येथून फैसल पाकिस्तानात गेल्यानंतर त्यास अतिरेकी संघटनेत सहभागी करून घेण्यात आले.'फैसल सुशिक्षित असून, त्याला आखाती देशामध्ये चांगलीनोकरी देण्याचे आमिष दाखवून भुलविण्यात आले. शारजाहमध्ये बोलावून त्याचे मन परिवर्तन करण्यात आले. इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून, अतिरेकी संघटनांचे सदस्य त्याच्या संपर्कात होते, असे सूत्रांनी सांगितले.शस्त्र चालविणे, बॉम्ब बनविण्याचे फैसलने प्रशिक्षण घेतले. त्याला मुंबईची रेकी करण्यासाठी पाठवल्याची माहिती जुहू येथील एटीएसला मिळाली. त्यानुसार ११ मे रोजी पथकाने आंतरराष्टÑीय विमानतळ परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
संशयित अतिरेक्याला मुंबईत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 4:09 AM