Join us

धनंजय मुंडेंना निलंबित करा, भाजपाचा विधानसभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 4:33 AM

विधान परिषदेत प्रश्न दडपण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पैसे घेतल्याच्या वृत्तावरून भाजपाच्या सदस्यांनी आज विधानसभेत प्रचंड गदारोळ केला आणि त्यात सभागृहाचे कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले.

मुंबई : विधान परिषदेत प्रश्न दडपण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पैसे घेतल्याच्या वृत्तावरून भाजपाच्या सदस्यांनी आज विधानसभेत प्रचंड गदारोळ केला आणि त्यात सभागृहाचे कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले. त्याचवेळी शिवसेनेच्या सदस्यांनी विधान परिषदेचे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला.या गदारोळात सकाळच्या लक्षवेधी सूचना वगळता सभागृहाचे कुठलेही कामकाज आज होऊ शकले नाही. एरवी सत्तापक्षाच्या नावाने विरोधक शिमगा करतात पण आज ही जबाबदारी स्वत:कडे घेत सत्तारुढ भाजपाच्या सदस्यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. भाजपाचे अनिल गोटे यांनी एका व्यक्तीने मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांचा संदर्भ देत विरोधी पक्षनेत्यावर असे आरोप होणे हा लोकशाहीचा अपमान आहे. ‘आप का सवाल लगनेवाला है, आप क्या करनेवाले है’ असे फोन विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातून गेल्याचे रेकॉर्ड आपल्याकडे आहे, असा दावा गोटे यांनी केला. मुंडेंवरील आरोपांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्र्तींमार्फत चौकशी करा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना निलंबित करा, अशी मागणी गोटे यांनी केली आणि ती भाजपाच्या सर्व सदस्यांनी उचलून धरत वेलमध्ये, धनंजय मुंडे हाय हाय, धनंजय मुंडेंना निलंबित करा, अशी घोषणाबाजी केली.या गदारोळातच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या बचावासाठी धाऊन आले. पवार म्हणाले की त्या कथित सीडीमध्ये धनंजय मुंडे यांचा आवाज नाही. त्यांचा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. असे असताना केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मुंडेंवरील आरोपांची शाहनिशा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, मुख्यमंत्री, सांसदीय कामकाज मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांची एक समिती स्थापन करावी. त्या आॅडिओ सीडीमध्ये तथ्य आढळले तर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, असे प्रतिआव्हान अजित पवार यांनी दिले.शिवसेनेची वेगळी चूलपरिचारकांवरुन गोंधळविधानसभेत भाजपाचे आमदार हे धनंजय मुंडेंच्या निलंबनाच्या मागणवीरून आक्रमक झालेले असताना शिवसेनेने विधान परिषदेतील भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याच्या मागणीवरून गदारोळ केला. देशासाठी सीमेवर लढणाºया जवानांचा अपमान करणाºया परिचारकांचे निलंबन कायम ठेवण्याची मागणी शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी केली.भाजपाचे आमदार मुंडेंवरून गोंधळ घालत असताना शिवसेनेचे आमदार परिचारकांच्या मुद्यावरुन वेलमध्ये उतरले आणि घोषणा देऊ लागले. सैनिकांचा अपमान करणारे परिचारक हाय हाय, परिचारकांना निलंबित ठेवा, अशा घोषणा त्यांनी दिल्या. भाजपाच्या सदस्यांनी धनंजय मुंडेंच्या निलंबनाच्या मागणीवरून सभागृह डोक्यावर घेतले असताना मित्र पक्ष शिवसेनेने मात्र त्यांना साथ दिली नाही.>शिवसेना आणणार निलंबन प्रस्तावभाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याच्या मागणीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधान परिषदेतही आक्रमक भूमिका घेतली. भारतीय सैन्याचा अपमान करणाºया परिचारकांचे निलंबन कायम राहावे यासाठी सोमवारी सभागृहात नोटीस देऊन तसा प्रस्ताव आणू , अशी घोषणा शिवसेना गटनेता अनिल परब यांनी विधान परिषदेत केली.

टॅग्स :धनंजय मुंडे