चोरीच्या मोबाइल प्रकरणी हवालदार निलंबित
By admin | Published: October 3, 2015 11:49 PM2015-10-03T23:49:43+5:302015-10-03T23:49:43+5:30
शहर पोलीस चोरीचे मोबाइल वापरत असल्याची बाब ग्रामीण पोलिसांनी उघड केल्यावर सुरू झालेल्या त्या चौकशीच्या पहिल्या फेरीत आठ जणांवर ठपका ठेवून अटकेत असलेल्या
ठाणे : शहर पोलीस चोरीचे मोबाइल वापरत असल्याची बाब ग्रामीण पोलिसांनी उघड केल्यावर सुरू झालेल्या त्या चौकशीच्या पहिल्या फेरीत आठ जणांवर ठपका ठेवून अटकेत असलेल्या भिवंडी गुन्हे शाखेतील त्या हवालदारास आयुक्तांनी निलंबित केले आहे. तर, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह अन्य सहा कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. हा अहवाल प्राथमिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एप्रिल महिन्यात भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळसिंद गावात आरहम कंपनीच्या गोदामामधून एक कोटी २७ लाखांचे मोबाइल चोरी गेले होते. याप्रकरणी भिवंडी गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली होती. त्या वेळी आरोपीकडून २३९ मोबाइल हस्तगत केले होते. मात्र, भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १४ मोबाइल स्वत:कडे ठेवून त्यांचा वापर सुरू केला. त्यांची किंमत ५० लाख रुपये असल्याचे समजते. परंतु, ग्रामीण पोलिसांच्या तपासात ही बाब पुढे आल्यावर त्यांनी भिवंडी गुन्हे शाखेतील हवालदार सुनील बांगर याला अटक केली.
याप्रकरणी ठाणे शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी चौकशीचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांना दिले होते. ती करताना त्यांनी नुकताच प्राथमिक तपास अहवाल सादर केला. त्यानुसार, बांगर याला निलंबित केले आहे. तर, अन्य कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई केली आहे. यामध्ये गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राजभोज यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तर, सहा हवालदारांची बदली पोलीस मुख्यालयात केली आहे.
यातील हवालदार सध्या भिवंडी गुन्हे शाखा आणि भिवंडी कंट्रोल रूममध्ये कार्यरत होते. हा अहवाल प्राथमिक तपासाचा असून
त्यानुसार कारवाई केली आहे. मात्र, ही अंतिम चौकशी नसून याची ती
सुरुवात असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस जनसंपर्क अधिकारी गजानन काबदुले यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)