Join us  

एमएचटी-सीईटी विद्यार्थ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करा

By रेश्मा शिवडेकर | Published: June 20, 2024 9:40 PM

आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबई-एमएचटी-सीईटीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात अनेक त्रुटी असल्याने तक्रारदार विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी युवा सेनेचे प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे केली आहे.

सीईटी सेलद्वारे जाहीर करण्यात आलेल्या इंजिनिअरिंग, फार्मसीच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीत अनेक त्रुटी असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालक करत आहेत. या विद्यार्थी पालकांनी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांना भेटून आपले गाऱहाणे मांडले. विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतल्यानंतर ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहून इंजिनिअरिंग, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे.

सर्व विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी केल्याचे युवासेना नेते आणि माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

तज्ज्ञांकडून निकालाची तपासणी

एमएचटी-सीईटीतील प्रत्यक्ष गुण आणि पर्सेंटाईलमधील तफावतीवरून निकालाबाबत शंका व्यक्त करणाऱया विद्यार्थ्यांच्या समाधानाकरिता सीईटी सेलने गुरूवारी जाहीर खुलासा केला. पर्सेंटाईल काढण्यासाठी वापरण्यात आलेला फार्मुला विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता आधीच जाहीर कऱण्यात आला होता. तसेच निकालानंतरही त्याची तपासणी तज्ज्ञांकडून कऱण्यात आली होती, असा खुलासा सेलकडून करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत शंका आहेत, त्यांनी सीईटी सेलच्या कार्यालयात येऊन आपले शंकानिरसन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, सीईटी सेलच्या कार्यालयात जाऊनही आपल्या शंकांचे निरसन होत नसल्याचे विद्यार्थी-पालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेपरीक्षा