Join us

"पालिका आयुक्तांचे निलंबन करा", गोखले पुलाच्या चौकशीचीही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 3:11 PM

मुंबई महापालिका आणि रेल्वेने केलेली गोखले पुलाची पुनर्बांधणी ही देशाला लाजवेल अशी गोष्ट आहे. यंत्रणांच्या या अपयशाची बातमी जगभरात पसरली आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे निलंबन करावे आणि अंधेरीतील गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत झालेल्या लाजिरवाण्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वेने केलेली गोखले पुलाची पुनर्बांधणी ही देशाला लाजवेल अशी गोष्ट आहे. यंत्रणांच्या या अपयशाची बातमी जगभरात पसरली आहे. तरीही दोन्ही यंत्रणा दोषारोपाच्या खेळात मग्न आहेत. या प्रकल्पातील मुख्य दायित्व असलेले महापालिका आयुक्त चहल आणि रेल्वेच्या समकक्ष अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश जारी करावेत. जेणेकरून त्यांना या प्रकल्पात हस्तक्षेप करून गडबड करता येणार नाही आणि करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याबद्दल निष्पक्ष चौकशीला सामोरे जाता येईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मुंबई महापालिका आयुक्तांची बदली बऱ्याच काळापासून रखडली आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरही मुख्यमंत्री निवडणूक आयोगाला गृहीत धरत आयुक्तांची बदली करणे टाळत आहेत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेना