अन्नसुरक्षा अधिकारी निलंबित, विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात दमबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 05:41 AM2018-03-17T05:41:54+5:302018-03-17T05:41:54+5:30
विधान परिषदेत गुटखाबंदीचा विषय का मांडला म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात येऊन दमबाजी केल्याच्या आरोपावरून अन्न व औषध प्रशासन खात्याचे भिवंडीचे अन्नसुरक्षा अधिकारी आर. डी. आकरूपे यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
मुंबई : विधान परिषदेत गुटखाबंदीचा विषय का मांडला म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात येऊन दमबाजी केल्याच्या आरोपावरून अन्न व औषध प्रशासन खात्याचे भिवंडीचे अन्नसुरक्षा अधिकारी आर. डी. आकरूपे यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी राज्यातील गुटखाबंदीचा विषय एका लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. या प्रकरणी खात्याचे अधिकारी व गुटखा तस्कर यांचे संबंध असल्याने याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली होती. त्यावर या प्रकरणाच्या सुरुवातीला दक्षता पथकामार्फत व त्यानंतर समाधान न झाल्यास सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते.
विधान परिषदेतील या चर्चेनंतर आज आर. डी. आकरूपे यांनी एका भाजपा आमदारासह गुरुवारी आपल्या कार्यालयात येऊन, गुटखाबंदीचा विषय का मांडला म्हणून तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली, असा आरोप मुंडे यांनी सभागृहात केला. एखादा अधिकारी थेट विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात धमक्या देत असेल तर काम कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करत या सदनात काम करण्याची इच्छा राहिली नसल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली. सुनील तटकरे, जयंत पाटील, कपिल पाटील, जयवंत जाधव यांनी हा विषय लावून धरल्याने कामकाज दोनदा तहकूब झाले.