२२ लाखांच्या लाचखोरीचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाईन शॉप मालकाकडून २२ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी निलंबित केलेला पोलीस निरीक्षक आनंद भोईर याला गृह विभागाच्या आदेशाने पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. भोईर सध्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत आहे.
गुन्हे शाखेत असताना अंधेरीतील गोडावूनवर छापा टाकून विदेशी मद्याच्या ९०० बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईचा तपास भोईर करत होता. याप्रकरणी एका आरोपीला अटक केल्यानंतर या गुन्ह्यामध्ये फोर्ट परिसरातील लिबर्टी वाईन शॉपच्या मालकाच्या भावाचे नाव समोर आले. त्याला या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी भोईर याने वाईन शॉप मालक अशोक पटेलकडे २५ लाखांची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती २२ लाखांची लाच घेताना १ जानेवारी २०१९मध्ये एसीबीच्या पथकाने भोईर याला सापळा रचून रंगेहात पकडून अटक केली. त्यानंतर त्याच्या इनोव्हा कारमधून एका पिस्तुलासह दोन मॅगेझीन आणि सात जिवंत काडतुसे तसेच डझनभर डेबिट आणि क्रेडिट कार्ड एसीबीने जप्त केली होती. हे प्रकरण अजूनही एसीबी कोर्टात प्रलंबित आहे.
या कारवाईनंतर खात्यांतर्गत केलेल्या चौकशीत भोईर दोषी आढळल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भोईरवर सप्टेंबर २०१९मध्ये निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर भोईरने तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली. त्यांनी निलंबनाच्या कारवाईवर स्टे आणण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले. मात्र, बर्वे यांनी त्याला विरोध केला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. भोईर यांच्या निलंबनाबाबत गृह विभागाकडे केलेल्या याचिकेत त्यांचे निलंबन बेकायदेशीर आहे. मुळात लाचखोरीच्या प्रकरणात निलंबन होऊ शकत नाही. आतापर्यंत असे अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय, भोईर यांनी आतापर्यंत मुंबई तसेच ठाण्यात अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणे हाताळल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. गृह विभागाच्या आदेशाने त्यांना पुन्हा मुंबईत सेवेत घेण्यात आल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.