खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:35 AM2020-06-07T05:35:59+5:302020-06-07T05:36:12+5:30
संडे अँकर। ख्वाजा युनूस प्रकरण; १५ वर्षांनी कार्यरत; अन्य तीन अंमलदारही रुजू
मुंबई : घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ख्वाजा युनूसच्या मृत्यू प्रकरणात निलंबित करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह अंमलदार राजाराम निकम, राजेंद्र तिवारी, सुनील देसाई यांना १५ वर्षांनी पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. शनिवारपासून ते कर्तव्यावर रुजू झाले.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आलेल्या निलंबन आढावा बैठकीत त्यांच्यासह १८ जणांना पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले. या बैठकीत, ९५ पोलीस कर्मचारी/ अधिकाऱ्यांचे निलंबन कायम ठेवण्यात आले आहे. पुन्हा सेवेत दाखल करून घेतलेल्या पोलिसांची सशस्त्र पोलीस दलात नेमणूक करण्यात आली आहे. घाटकोपर बेस्ट बसमध्ये २ डिसेंबर २००२ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा बळी, तर ३१ जण जखमी झाले होते. याच प्रकरणात संशयित म्हणून परभणीतील सॉफ्टवेअर इंजिनीअर ख्वाजा युनूसला (२७) अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीसाठी औरंगाबादला नेत असताना, पोलिसांच्या जीपला ६ जानेवारी २००३च्या रात्री अपघात झाला. त्या वेळी परिस्थितीचा फायदा घेऊन ख्वाजा युनूस पळून गेला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मात्र त्याला पोलिसांनीच कारस्थान रचून मारल्याचे आरोप झाले होते. त्यानुसार, २००४ मध्ये निकम, तिवारी आणि देसाई या अंमलदारांना निलंबित करण्यात आले. त्यापाठोपाठ १६ नोव्हेबर २००४ रोजी वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणात १४ जण संशयाच्या भोवºयात अडकले होते. मात्र त्यापैकी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे व तीन कॉन्स्टेबलच्या विरोधात चौकशी सुरू होती. मात्र ठोस पुरावे सापडले नाहीत.
चौकशीला कंटाळून २००७ मध्ये वाझे यांनी राजीनामा दिला होता. मात्र प्रशासनाने तो स्वीकारला नाही.
पुन्हा सेवेत दाखल झालेले अन्य कर्मचारी/ अधिकारी
पोलीस निरीक्षक संजीव तावडे, सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब शिंदे, अनंत जाधव, संजय माळी, पोलीस उपनिरीक्षक रेखा सायकर, सुधाकर हिंदळेकर यांच्यासह पोलीस अंमलदार संजय तेकर, संजय नवणे, गोरख देशमुख, सुनील कसबे, रमजान तडवी, अक्षय चौगुले, अर्चना रडे, विलास जरे.