निलंबित सचिन वाझे बनला माफीचा साक्षीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:51 AM2022-05-27T08:51:52+5:302022-05-27T08:52:23+5:30
सचिन वाझेने यापूर्वी तपास यंत्रणा व न्यायालयाला आपल्याला ‘माफीचा साक्षीदार’ करावे, यासाठी पत्र पाठवले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या मंजुरीनंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनला आहे. माफीचा साक्षीदार बनल्यानंतर वाझेला आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतील, असे सीबीआयने स्पष्ट केले.
सचिन वाझेने यापूर्वी तपास यंत्रणा व न्यायालयाला आपल्याला ‘माफीचा साक्षीदार’ करावे, यासाठी पत्र पाठवले होते.
वाझे माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याने त्याला सरकारी वकिलांचा साक्षीदार बनावे लागेल व अन्य आरोपींच्या विरोधात साक्ष द्यावी लागेल. याचाच अर्थ वाझे अनिल देशमुखांविरोधात न्यायालयात साक्ष देणार आहे. माफीचा साक्षीदार बनल्याने वाझेला शिक्षेत दया दाखवली जाऊ शकते.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. वाझे याने याप्रकरणी ईडीला आपण माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचे सांगितले. पण, ईडीने अद्याप त्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. विशेष पीएमएलए न्यायालयाने वाझेचा जामीन अर्ज फेटाळताना म्हटले की, वाझे गुन्ह्यातील सक्रिय सदस्य होता.