लालबाग मारहाण प्रकरणी महिला पोलीस निलंबित
By Admin | Published: September 30, 2015 02:04 AM2015-09-30T02:04:45+5:302015-09-30T02:04:45+5:30
लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीसह तिच्या आईला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्तांकडून खातेनिहाय चौकशी सुरु होती
मुंबई: लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीसह तिच्या आईला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्तांकडून खातेनिहाय चौकशी सुरु होती. याचा अंतरिम अहवाल आज पोलीस आयुक्तांकडे सादर केला. या अहवालानुसार आयुक्तांच्या आदेशाने मारहाण करणाऱ्या दोन महिला पोलिसांना निलंबित करण्यात आले. वर्षा पाटील आणि अनुराधा सोलुंकी असे निलंबित महिला पोलिसांचे नावे असून दोघीही एल ए ३ मधील कर्मचारी आहे.
मारहाण प्रकरणी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना याप्रकरणी चौकशी करुन ४८ तासांत सदर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी याचा अंतरीम अहवाल आयुक्तांपुढे सादर करण्यात आला. त्यामध्ये ड्यूटीवर असताना तरुणीसह तिच्या आईला मारहाण केल्याप्रकरणी दोन महिला पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती कायदा व सुव्यवस्थेचे देवेन भारती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या प्रकरणी नंदिनीच्या कुटुंबियांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. नंदिनी कामावर असल्याने तिचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. यामध्ये दोन महिला पोलिसांनी चौकीमध्येही नंदिनीला चोप दिल्याचे भारती यांनी सांगितले. जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुढील तपास सुरु आहे. पाटील आणि सोलुंकी सशस्त्र पोलीस दलातील कक्ष ३ मध्ये कार्यरत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून त्या काम करत आहेत.
..............................................
वकील संघटनेनेही
दिले आयुक्तांना पत्र
तरुणीसह महिला पत्रकाराला झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. अॅडव्होकेट असोसिएशन आफ इंडियाने याचा निषेध करत पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट डॉ. नीलेश परमार, महिला शाखेच्या अध्यक्ष गीतांजली शिंदे आणि महासचिव अॅड. महेश वासवानी यांची उपस्थिती होती. नंदिनीच्या तक्रार अर्जाची वाट न पाहता मुंबई पोलिसांनी आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करुन ठोस पावले उचलण्याची मागणी त्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
आम्ही कंट्रोल करण्यासाठी हात उगारला...
रात्री एकच्या सुमारास दोन पोलीस शिपाई आमच्याकडे आले. त्यांनी एक तरुणी पोलिसांंना शिवीगाळ करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार आम्ही तिच्याकडे धाव घेतली असता, एसीपी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर तिचा धिंगाणा सुरु होता. एका पोलीस शिपायाची कॉलर पकडून तिने बॅरिकेट्सला लाथा मारण्यास सुरुवात केली. तिला आवर घालण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याने दारुच्या नशेत असलेल्या नंदिनीने आम्हाला मारहाण करत शिविगाळ करण्यास सुरुवात केली. आमच्या पोटात लाथ मारली. आम्ही तिला कंट्रोल करण्यासाठी हात उगारल्याचे निलंबित महिला पोलीस वर्षा पाटील आणि अनुराधा सोलुंकी यांचे म्हणणे आहे.
कडक कारवाई व्हावी ...
जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी माझ्या आईवर हात उगारला, तिचे कपडे फाडले. याचा जाब विचारण्यासाठी मी पुढाकार घेतला, म्हणून मला तीन ते चार महिला पोलिसांनी मारहाण केली. रस्त्यावर पाडून, केस ओडून मारहाण केली. वायरलेस गाडीमध्ये बसवून मार देत पोलीस ठाण्यात आणले. तेथे मला लाकडी दांडक्याने खाली पाडून मारले. त्याचे व्रण अंगावर आहेत. त्यानंतर माझ्या आईला मारहाण करत असताना मी पुढाकार घेतला. विनवणी केल्यानंतर १२०० रुपये दंड भरुन आम्हाला सोडण्यात आल्याची माहिती नंदिनीने ‘लोकमत’शी बोलताना दिली.