Join us  

मुंबई पोलिसातील ते चार अधिकारी कोण?; ड्रग्ज प्रकरणात अडकू नये म्हणून देणारे होते लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 7:49 PM

अंगझडती घेतना संशयिताच्या खिशात ड्रग्ज टाकणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Mumbai Police :मुंबईत तीन ते चार दिवसांपूर्वी एका व्यक्तीला आरोपी बनवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या खिशात ड्रग्ज ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अंगझडती घेतना संशयिताच्या खिशात ड्रग्ज टाकतानाचे कृत्य तिथल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होतं. ही घटना समोर आल्यानंतर चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस तपासात या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आपण केलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याचे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी लाच देण्याचाही प्रयत्न केला.

खार पोलीस ठाण्यामध्ये तैनात असलेल्या चार अधिकाऱ्यांनी कलिना भागात एका व्यक्तीला आरोपी बनवण्यासाठी त्याच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि नंतर त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेनंतर खार पोलीस ठाण्यातील चार अधिकाऱ्यांविरोधात चौकशी सुरू करण्यात आली असून सध्या त्यांना निलंबित करण्यात आले. आता चौकशीनंतर या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

३० ऑगस्ट रोजी कलिना येथील शाहबाज खान यांच्या गोठ्यात काम करणाऱ्या डॅनियलला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या खिशात २० ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याचा दावा पोलिसांनी केला. शाहबाज खान यांनी सीसीटीव्ही तपासले तेव्हा एक पोलीस कर्मचारी डॅनियल खिशात ड्रग्ज ठेवताना दिसून आला. त्यानंतर खान यांनी हा प्रकार खार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी सीसीटीव्ही पाहून डॅनियलला सोडून दिले.

फुटेज व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॅनियला ताब्यात घेणारे दोघे व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली. ते चौघेही खार पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर  त्या पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान या पोलीस अधिकाऱ्यांनी खान यांना ते सीसीटीव्ही फुटेज कुठेही पोस्ट करु नका असे सांगत २० लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती.

खान यांनी आरोप केला की हे संपूर्ण प्रकरण एका विकासकाने आणि माजी नगरसेवकाने रचले होते ज्यांना त्यांचा कलिना येथील ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दोन एकरचा भूखंड हवा होता. खोट्या प्रकरणात अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न उघड करण्यात सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे खान म्हणाले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस