मुंबई: टिव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला राहुल राज सिंग याच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी उच्च न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत तहकूूब केली आहे. त्यामुळे राहुल आणखी एक आठवडा जामिनावर राहणार आहे.न्या. मृदूला भाटकर यांनी राहुलच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २५ एप्रिलपर्यंत तहकूब केली. मात्र त्याला आधी मंजूर करण्यात आलेल्या अटी पाळाव्या लागणार आहे. त्यामुळे राहुलला बांगुर नगर पोलीस स्थानकात चौकशीसाठी २३ एप्रिलपर्यंत हजर राहावे लागणार आहे.प्रत्युषा आत्महत्येप्रकरणी राहुलने ७ एप्रिल रोजी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पण सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला राहुललने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने १२ एप्रिल रोजी राहुलला अंतरिम दिलासा देत त्याला १८ एप्रिल पर्यंतचा अंतरिम जामीन मंजूर केला.सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी सरकारला याप्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करायची आहे आणि त्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी न्या. भाटकर यांना केली. सरकारी वकील उषा केजरीवाल यांनी राहुल तपासासाठी सहकार्य करत नसल्याची तक्रारही न्या. भाटकर यांच्याकडे केली. ‘याप्रकरणी जास्त तपास होऊ शकला नाही. कारण घटनेच्यानंतर राहुल लगेचच रुग्णालयात दाखल झाला आणि आता तो तपासासाठी पोलिसांना सहकार्य करत नाहीये,’ असे अॅड. केजरीवाल यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. राहुल प्रत्युषाला मारहाण करत असे. थेट तिच्या बँक खात्यातून पैसे काढत असे. त्यामुळेच प्रत्युषाने आत्महत्या केली असावी, असे पोलिसांनी गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे.
राहूलच्या जामिनाची सुनावणी तहकूब
By admin | Published: April 19, 2016 4:00 AM