लाचखोर उपअधीक्षक पालचे निलंबन अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:06 AM2021-07-27T04:06:28+5:302021-07-27T04:06:28+5:30
पोलीस मुख्यालयात अहवाल सादर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : परभणी जिल्ह्यातील लाचखोर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल ...
पोलीस मुख्यालयात अहवाल सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परभणी जिल्ह्यातील लाचखोर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल याचे निलंबन अटळ आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल सोमवारी पोलीस मुख्यालयात सादर करण्यात आला आहे. तो गृह विभागाकडे तत्काळ पाठविला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एका तरुणाला गुन्ह्यात न अडकविण्यासाठी पालने दोन कोटींची मागणी करून दीड कोटींवर तडजोड केली होती. त्यातील १० लाखांचा पहिला हप्ता घेतल्यानंतर शुक्रवारी एसीबीने त्याला अटक केली आहे. सेलू उपविभागीय कार्यालयाचे उपअधीक्षक असलेल्या पालने मागणी केलेल्या लाचेच्या मोठ्या रक्कमेमुळे हा विषय पोलीस वर्तुळात चर्चेचा बनला आहे. ग्रामीण भागातून अशी वसुली करणाऱ्या या अधिकाऱ्याने यापूर्वी मुंबई, नागपूर सारख्या महानगरात कार्यरत असताना किती कमाई केली असेल?, याचा तर्क लावला जात आहे. पालला पोलीस कोठडी मिळाल्याने त्याचे निलंबन अटळ आहे. मात्र, त्याबाबतचा प्राथमिक तपासाचा अहवाल परभणी अधीक्षकांकडून पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी तातडीने मागवून घेतला. तो गृह विभागात पाठविला जाईल, तेथून निलंबनावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईच्या एसीबी पथकाने पाल याच्या मुंबईतील घराची झडती घेऊन २४ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे.