मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर पालघर झुंडबळी प्रकरण व वांद्रे स्थानकाबाहेर जमलेल्या जमावासंदर्भात चिथावणीखोर विधाने केल्याबद्दल दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, सकृतदर्शनी कोणताही गुन्हा घडल्याचे दिसत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील फौजदारी प्रक्रियेला स्थगिती दिली.
गोस्वामी यांनी काँग्रेस आणि त्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष करून टीकाटिप्पणी केली असली तरी त्यामुळे समाजात अशांतता निर्माण झाल्याचे किंवा दोन समाजात दंगल उसळेल, असे कोणतेही विधान केले नाही, असे न्या. उज्जल भूयन व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने म्हटले.
बदला घेण्याच्या भीतीने थंड न बसता सत्तेला जाब विचारणारा पत्रकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत भारताचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे. जाहीर विवाद सुरू असताना पत्रकाराच्या डोक्यावर टांगलेली तलवार आपण पाहू शकत नाही. आता आपली लोकशाही परिपक्व आहे, असेही न्यायालयाने म्हटले. अर्णब गोस्वामी यांनी दोन्ही प्रकरणांतील गुन्हे रद्द करण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका अंतिम सुनावणीसाठी ठेवत न्यायालयाने पोलिसांना गोस्वामी यांच्यावर कडक कारवाई न करण्याचे आदेश दिले.