पाणलोट भ्रष्टाचारप्रकरणी शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित
By Admin | Published: April 7, 2015 10:38 PM2015-04-07T22:38:11+5:302015-04-07T22:38:11+5:30
महाड तालुक्यातील खर्डी या गावात ‘एकात्मिक पाणलोट विकास’ योजनेंतर्गत बेकायदा कामे झाली आहेत. याप्रकरणी संदेश महाडिक व बाबासाहेब महाडिक
जयंत धुळप, अलिबाग
महाड तालुक्यातील खर्डी या गावात ‘एकात्मिक पाणलोट विकास’ योजनेंतर्गत बेकायदा कामे झाली आहेत. याप्रकरणी संदेश महाडिक व बाबासाहेब महाडिक यांनी १२ एकर जमिनीचे २२ लाख ८२ हजार ७८३ रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार महाड पोलीस ठाण्यात केली आहे.
योजनेची व्याप्ती पहाता, येत्या पंधरा दिवसात तपासात प्रगती दाखविण्यात येईल, तसेच संबंधित आरोपीवर कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन महाडचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिले. त्यामुळे मंगळवारपासून महाड तहसीलदार कार्यालयासमोर पुकारलेले बेमुदत उपोषण आंदोलन १५ दिवसांकरिता स्थगित करण्यात आल्याची माहिती अन्यायग्रस्त शेतकरी संदेश महाडिक यांनी दिली आहे.
खर्डी पाणलोट भ्रष्टाचार व उपोषण आंदोलनाच्या अनुषंगाने महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजीराव देशमुख, पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्याशी तहसीलदार एस.बी. कदम यांनी चर्चा केली.
१५ दिवसात गुन्ह्याचा तपास करुन समाधानकारक निर्णय येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिला. त्यामुळे उपोषणासारखी टोकाची भूमिका न घेता सामंजस्याने उपोषण मागे घ्यावे, असे लेखी पत्र तहसीलदार कदम यांनी दिल्याने शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले.