पदाचा गैरवापर करणाऱ्या चार पोलिसांचे निलंबन
By admin | Published: July 11, 2015 10:34 PM2015-07-11T22:34:54+5:302015-07-11T22:34:54+5:30
तुझ्याविरुद्ध एका महिलेने तक्रार दिली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करावयाचा नसेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील,’ असे धमकावून, तडजोडीअंती त्याच्याकडून
अलिबाग : ‘तुझ्याविरुद्ध एका महिलेने तक्रार दिली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करावयाचा नसेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील,’ असे धमकावून, तडजोडीअंती त्याच्याकडून ५३ हजार रुपये घेणाऱ्या श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक पी. बी. कोकरे यांच्या विरुद्ध येथील ग्रामस्थाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या प्राथमिक चौकशीनंतर त्यास तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध चौकशीची कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी शनिवारी केली आहे.
दरम्यान, गेल्या गुरुवारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह दोन आरोपी फरार झाल्याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ए. आर. सोनावणे, पोलीस हवालदार व्ही. एस. गायकवाड व पोलीस शिपाई एस. एस. कदम यांनी कर्तव्यात कसुर केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या तिघांनाही तत्काळ सेवेतून निलंबित करून त्यांच्या विरुद्धही विभागीय चौकशीची कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक हक यांनी केली आहे.
पदाचा गैरवापर आणि पोलीस कर्तव्य कसुरीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी अत्यंत कठोर भूमिका स्वीकारली असल्याने रायगड पोलीस दलात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.