मुंबई : पायधुनी भागातील बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात कुचराई केल्या प्रकरणी, ‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त जिवक घेगडमल यांना निलंबित करण्याचे आदेश, विधानसभेत तीन आठवड्यांपूर्वी देण्यात आले होते. तीन आठवड्यांनंतर या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास राज्य सरकारने महापालिकेला कळविले आहे. त्यानुसार, अखेर आज घेगडमल यांच्यावर आयुक्त अजय मेहता यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या जागेवर ‘बी’ विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरूर यांना सी विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी विधान सभेत प्रश्नोत्तर तासाला घेगडमल यांच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता. पायधुनी येथील इस्माइल कार्टे रोडवर नऊ मजली बेकायदा इमारत उभी राहिली असून, यावर कारवाई करण्यात महापालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयातील अधिकारी कमी पडल्याचा आरोप या वेळी करण्यात आला होता. म्हाडाने या बेकायदा बांधकामाकडे लक्ष वेधल्यानंतर, महापालिकेने संबंधित विकासकाला नोटीस पाठविल्याचे समोर आले. याची गंभीर दखल घेऊन, राज्य सरकारने घेगडमल व अन्य संबंधित अधिकाºयांना निलंबित करण्याचे आदेश दिले.याबाबतचे लेखी आदेश राज्य सरकारकडून नुकतेच महापालिका प्रशासनाला पाठवले आहेत. यामध्ये बेकायदा इमारतींवर कारवाई न करणाºया अधिकाºयांना निलंबित करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. या इमारतीला पालिका अधिनियमांतर्गत नोटीस पाठविली आहे. आयुक्त त्यांच्या स्तरावर या इमारतीला काम थांबविण्याचे नोटीस देऊ शकत असताना कारवाई का झाली नाही, याचा खुलासा राज्य सरकारने मागविला आहे.
मुंबई पालिकेच्या सहायक आयुक्तांचे निलंबन, राज्य सरकारच्या आदेशानंतर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:39 PM