मुंबई : नाईट रायडर्स स्पोर्ट प्रा. लि. व कंपनीचा संचालक बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याला प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या ‘कारणे-दाखवा’ नोटीसला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने याच प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला हिला प्राप्तिकर विभागानं बजावलेल्या नोटिशीलाही स्थगिती दिली. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, शाहरूख व त्याच्या कंपनीने कंपनीचे शेअर्स दर कमी दाखवले होते.शाहरूख खान व जुही चावला यांच्या नाईट रायडर्स स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर प्राप्तिकर विभागाने केलेले सर्व आरोप सिद्ध करण्यासाठी सकृतदर्शनी कोणतेही भक्कम पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत, असे म्हणत न्या. एम. एस. संकलेचा व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या ‘कारणे-दाखवा’ नोटिशीला स्थगिती दिली आहे.मार्च २०१७मध्ये प्राप्तिकर विभागाने नाईट रायडर्स स्पोर्ट प्रा. लि. या कंपनीचा संचालक शाहरूख खान व जुही चावला यांना ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. या नोटिशीला शाहरूख खान व जुही चावला या दोघांनीही उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.या याचिकेवरील गुरुवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने म्हटले की, प्राप्तिकर विभागाच्या मूल्यांकन अधिका-याने या प्रकरणात लक्ष घालून काहीही चुकीचे घडले नसल्याचे स्पष्ट करत ही केस बंद केली आहे. तरीही प्राप्तिकर विभागाने मत बदलल्याचे म्हणत या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली.
प्राप्तिकर विभागाने शाहरूख खानला बजावलेल्या नोटीसला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:17 AM