मुंबई : शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे कनेक्शन बिलांच्या थकबाकीपोटी कापले जात असल्याबद्दल सत्तारूढ आणि विरोधी पक्ष सदस्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कनेक्शन कापण्यास तीन महिन्यांची स्थगिती देण्याची आणि आधी तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडून देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
तत्पूर्वी, वीज कनेक्शन कापले जात असल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. त्यांना शिवसेनेच्या आक्रमक आमदारांनी साथ दिल्याने सरकारला झुकावे लागले.कळमुनरीचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणकर यांची भूमिका उचलून धरली.
शेतकरी विजेअभावी आत्महत्या करीत आहे, सरकार किती लोकांना आणखी मरू देणार आहे, असा सवाल करीत फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडणीला आजच्या आज स्थगिती द्या, अशी मागणी केली. त्यातच भाजपचे सदस्य घोषणाबाजी करीत वेलमध्ये उतरले. कल्याणकर आदी शिवसेना सदस्यही उभे राहून मागणी लावून धरत होते.
वीज कनेक्शन कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच सभागृहात जाहीर केले होते, त्याचे काय झाले? असा सवाल फडणवीस यांनी केला. ऊर्जामंत्री या मुद्द्यावर उत्तर देतील, कामकाज होऊ द्यावे, असे तालिका अध्यक्ष म्हणाले. शिवसेनेचे महेश शिंदे, राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांनीही वीज कनेक्शन कापण्याला तातडीने स्थगिती देण्याची मागणी केली.
शेवटी ऊर्जामंत्री नितीन राऊत सभागृहात आले आणि वीज कंपन्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीची माहिती देतानाच त्यांनी सभागृहाची भावना लक्षात घेऊन कृषिपंपांच्या वीज कनेक्शन तोडणीस तीन महिने स्थगिती देण्याची व तोडलेले कनेक्शन तातडीने जोडून देणार असल्याची घोषणा केली. पक्षीय भेदापलीकडे जाऊन शेतकरी हिताचा मुद्दा रेटल्याबद्दल बालाजी कल्याणकर यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले.