मेगा पोलीस भरतीला स्थगिती; सरकारने दिले प्रशासकीय कारण, इच्छुक तरुणांचा पुन्हा हिरमोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 06:28 AM2022-10-30T06:28:10+5:302022-10-30T06:28:17+5:30
पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार यांनी याबाबत निवदेन काढले आहे.
मुंबई : तीन वर्षांपासून पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. भरतीची जाहिरात काढल्याच्या काही तासांतच प्रशासकीय कारण पुढे करत सरकारने प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पोलीस शिपाई संवर्गातील जवळपास १४,९५६ पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती.
पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार यांनी याबाबत निवदेन काढले आहे. २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे. नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल, असे म्हटले आहे. पोलीस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली होती. मात्र, पोलीस महासंचालकांनी आता भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना कळविले आहे.
वयोमर्यादा पूर्ण झालेल्यांना पुन्हा संधी?
भरतीला स्थगिती देण्यामागील कारणाचा पत्रकात उल्लेख नसला, तरी सूत्रांनुसार, कोरोना काळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी देण्यासाठी ती वाढवून देण्यावर विचार राज्य सरकारमध्ये सुरू आहे. त्यामुळेच या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.