Join us

नवनीत राणांविरोधातील अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 5:49 AM

राणा यांनी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात फेरफार बदल करत अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याची तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागासवर्गीयांसाठी राखून ठेवलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढता यावी, यासाठी फसवणूक करून जात प्रमाणपत्र मिळविल्याप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे वडील यांच्याविरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटला सत्र न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली.

दि. २३ सप्टेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने राणा व त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यांच्यावरील खटला चालविण्यासाठी न्यायालयाला दोघांवर आरोप निश्चित करायचे होते. मात्र, दोघेही गैरहजर राहिले. त्यापूर्वीही न्यायालयाने समन्स बजावूनही दोघे न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यामुळे न्यायालयाने दोघांवरही अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. 

राणा यांनी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात फेरफार बदल करत अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याची तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. जात प्रमाणपत्रामुळेच राणा अमरावती येथील राखीव मतदारसंघातून  निवडणूक लढवू शकल्या व त्या जागेवरून निवडूनही आल्या आहेत. सदर प्रकरणी पोलिसांनी राणा व त्यांचे वडील हरभजनसिंह कुंडले यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले व कारवाईही सुरू आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :नवनीत कौर राणा